डिचोली : म्हादई पाणी वाटप लवादाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आज कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. त्यानंतर कणकुंबीच्या विश्रामगृहात कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.लवादाच्या आदेशानुसार ३० एप्रिल रोजी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र यांच्या अधीक्षक अभियंत्यांची त्रिसदस्यीय देखरेख समिती अस्तित्वात आली. या समितीची आज पहिलीच बैठक कणकुंबी येथे झाली. सदर बैठकीत कळसा कालव्याचे कामकाज पाहणार्या कार्यकारी अभियंता नरसिंह अन्नावर यांनी लवादाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्या खात्याने जी पूर्वतयारी केली आहे त्याची आराखड्यासहीत माहिती त्रिसदस्यीय समितीला दिली.सदर आदेशाप्रमाणे आपले खाते आंब्याचो व्हाळ ते कणकुंबी गाव या ठिकाणी कळसा कालव्याचे जे बांधकाम केलेले आहे, त्याद्वारे कळसा नाल्याचे पाणी मलप्रभेत जाणार नाही, यासाठी आवश्यक चिरेबंदी बांधकाम कशा रितीने केले जाणार हे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी लवादाच्या निर्णयानुसार तांत्रिक सल्लागार समितीने जो आराखडा तयार केला होता आणि तिन्ही राज्यांनी ज्याला मान्यता दिली होती, त्यानुसार कर्नाटक कामकाज करत आहे की नाही यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.सदर कामकाज पूर्ण करण्यासाठी कर्नाटक सरकारने १५ लाखांची तरतूद केलेली असून कामाची निविदा कोणाला द्यावी याचा निर्णय कर्नाटक उद्यापर्यंत घेणार आहे. सध्या कणकुंबी येते कर्नाटक निरावरी निगमने कळसाच्या कामकाजाबाबत जी भूमिका घेतलेली आहे त्यासंदर्भात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कणकुंबीचे सरपंच दीपक वाडेकर यांनी कर्नाटकाने कळसा कालव्याचे कामकाज आमच्या गावात करून इथल्या जलस्रोतांना पूर्णत: उद्ध्वस्त केलेले आहे. पंचायतीतर्फे आम्ही वेळोवेळी आवाज उठविला आहे. परंतु कर्नाटक सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्राचे अधीक्षीक अभियंता के. एच. अन्सारी, त्याचप्रमाणे प्रमोद रणखांबे, कर्नाटकाचे अधीक्षक अभियंता अशोक वासनाड आणि गोव्याचे अबियंता श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता गोपीनाथ देसाई, सहाय्यक अभियंता सुरेश बाबू यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
कणकुंबीतील कळसा प्रकल्पाच्या कामाची पाहणी
By admin | Updated: May 9, 2014 02:15 IST