‘सनबर्न’ ही गोव्याची संस्कृती नव्हे : पार्सेकर
By Admin | Updated: December 28, 2014 09:38 IST2014-12-28T09:35:42+5:302014-12-28T09:38:04+5:30
साखळी येथे रवींद्र महोत्सवाचे उद्घाटन : विविध कार्यक्रमांचे आयोजन; मनोहर पर्रीकर यांचा सत्कार

‘सनबर्न’ ही गोव्याची संस्कृती नव्हे : पार्सेकर
डिचोली : गोव्याचे सांस्कृतिक वैभव विविध लोककलांच्या माध्यमातून टिकविण्यात आलेले आहे़ ‘सनबर्न पार्टी’ म्हणजे गोव्याची संस्कृती नव्हे़ त्यामुळे गोव्याची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी रवींद्र महोत्सवासारख्या उत्सवांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले़
साखळी रवींद्र भवनमध्ये आयोजित रवींद्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते़ दि़ २७ व २८ असे दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे़ महोत्सवात विविध स्पर्धा, शैक्षणिक आणि शेतीविषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत़ तसेच उद्योग विश्वाबाबत तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत़
या वेळी पार्सेकर म्हणाले की, मये गावाला पूर्ण मुक्ती देण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे़ लवकरच हे काम पूर्ण होईल, असे सांगितले़ केवळ सांस्कृतिकच नव्हे तर कला, नाट्य, कृषी, शिक्षण, उद्योग यामध्ये संपन्नता आणणारा हा महोत्सव असल्याचे पार्सेकर सांगितले़
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, साखळी येथील रवींद्र भवन डिचोली व साखळी परिसरातील कलाकार व जनतेसाठी वरदान ठरणारे आहे़ वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याचे सांस्कृतिक वैभव जोपासण्याचा प्रयत्न करू.
उपसभापती अनंत शेट यांनी या महोत्सवात गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडल्याचे सांगितले़ या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, ज्येष्ठ चित्रकार शिवानंद खेडेकर, डॉ. गुरू प्रसाद कानडी व शिक्षक गजानन कर्पे यांचा मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष
डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले़ या वेळी रवींद्र काणेकर, उमेश सरनाईक, उपेंद्र कर्पे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)