'सनबर्न' यंदा दक्षिण गोव्यात; कंपनीकडून जाहीर : यावर्षी संगीतासह पाण्याखालील जगाची सफर
By किशोर कुबल | Updated: July 12, 2024 15:39 IST2024-07-12T15:39:07+5:302024-07-12T15:39:42+5:30
पणजी : डिसेंबरअखेर वागातोर येथे होणारा सनबर्न इलेक्ट्रॉनिक्स डान्स फेस्टिवल यंदा दक्षिण गोव्यात होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ...

'सनबर्न' यंदा दक्षिण गोव्यात; कंपनीकडून जाहीर : यावर्षी संगीतासह पाण्याखालील जगाची सफर
पणजी : डिसेंबरअखेर वागातोर येथे होणारा सनबर्न इलेक्ट्रॉनिक्स डान्स फेस्टिवल यंदा दक्षिण गोव्यात होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यावर्षी संगीत व नृत्यासह पाण्याखालील जगाची सफर हा अनुभव अनोखा घेता येईल.
आशियातील हा आघाडीचा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) फेस्टिव्हल मानला जातो. त्या ईडीएमचे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे. दक्षिण गोव्यात २८ ते ३० डिसेंबर असे तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठिकाण नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये अजोड संगीत, फॅशन, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
दरवर्षी इयर एंडला होणाऱ्या या ईडीएमला देश, विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने येतात. त्याचे ऑनलाइन बुकिंग जून, जुलैपासून सुरू होत असते.
ईडीएमच्यावेळी वागातोर येथे किनारी भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत होत असे. त्यामुळे स्थानिकांचाही विरोध होता. आता ट्रॅफिक, प्रवेश, निर्गमन आणि पार्किंग सारख्या समस्यांवर उपाय मिळणार आहे असल्याचा दावा केला जात आहे. त्याच बरोबर फेस्टिव्हल मध्ये पुन्हा एकदा कँपसाईट असणार आहे.
सनबर्नचे सीईओ करण सिंग यांनी सांगितले “ नवीन जागेत आयोजन करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. दरवर्षी कार्यक्रमाचा दृष्टिकोन उंचावून अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तसेच लोकांना हा अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.'
ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी सांगितले “ सनबर्नमुळे गोव्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून, विविध क्षेत्रातील व्यवसायांत वाढ झाली आहे.'
दरम्यान, गोव्यात नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या देश, विदेशी पर्यटकांमध्ये हा ईडीएम आकर्षणाचा ठरला आहे. फेस्टिवलमध्ये होणाऱ्या ड्रग्स सेवनामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला आहे. यापूर्वी या फेस्टिवलमध्ये ड्रग्स सेवनाने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेले आहेत.