धारगळला सनबर्न करून दाखवाच!; प्रवीण आर्लेकरांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 11:58 IST2024-12-05T11:57:39+5:302024-12-05T11:58:03+5:30
परवान्यावर फेरविचार करण्याची मागणी

धारगळला सनबर्न करून दाखवाच!; प्रवीण आर्लेकरांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : आपला सनबर्न महोत्सव कुठेही करा, परंतु तो धारगळ येथे नको. धारगळच नव्हे तर अख्ख्या पेडणे मतदारसंघात हा महोत्सव होऊच देणार नाही, असा मी 'शब्द' देतो तरीही सनबर्नचे आयोजन धारगळ येथे केल्यास त्यानंतर काय होईल हे गोमंतकीयांना कळेल, असा रोखठोक इशारा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिला. पेडणे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच, नगरसेवक व ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक आर्लेकर यांनी बुधवारी घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आर्लेकर यांनी बैठकीवेळी धारगळ येथे सनबर्न महोत्सव कुणाला हवा आहे, त्यांनी आपला होकार कळवावा. जर कुणाला नको असेल तर नकार कळवावा, असे आवाहन केले. त्यावेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच महोत्सवाला विरोध असल्याचे सांगितले. उपस्थितांनी आम्ही सर्वजण आर्लेकरांच्या निर्णयाशी ठाम आहोत, असेही ते म्हणाले.
बैठकीला माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, धारगळ माजी सरपंच विद्यमान पंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, माजी सरपंच अनिकेत साळगावकर, मोपा सरपंच सुबोध महाले, तोरसेच्या सरपंच छाया शेट्ये, नगरसेविका अश्विनी पालयेकर, नगरसेविका तृप्ती सावळ, वजरीच्या माजी सरपंच संगीता गावकर, प्रकाश कांबळी, पोरस्कडे सरपंच दीप्ती हळदणकर, नगरसेविका तृप्ती सावळ, आदी पंच सदस्य उपस्थित होते.
धारगळचे पंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक म्हणाले, धारगळ ) पंचायतीने परवानगी दिली म्हणून काही होत नाही. सनबर्न येथील ग्रामस्थांनाच नको आहे. केवळ पाच पंच सदस्यांना सनबर्न हवा आहे, म्हणून जर परवाना दिला तर धारगळवासीया ते सहन करणार नाहीत. वेळप्रसंगी सनबर्नविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर व प्रकाश कांबळी यांनीही सनबर्नला विरोध असल्याचे सांगितले.
उधळून लावणारच
आर्लेकर म्हणाले की, सनबर्न हवा की नको, संदर्भात आजची बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. सनबर्नला तर सुरुवातीपासूनच आपला विरोध आहे. तरीही हा महोत्सव आयोजित केल्यास आपण नागरिकांसह आत घुसून तो उधळून लावू, याचा पुनरुच्चार आर्लेकरांनी बैठकीवेळी केला.