सनबर्न गोव्यात व्हायलाच हवा: आमदार जीत आरोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 12:01 IST2024-12-05T12:00:46+5:302024-12-05T12:01:02+5:30
आयोजन कुठे हा सरकार व स्थानिकांचा प्रश्न

सनबर्न गोव्यात व्हायलाच हवा: आमदार जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धारगळ येथे होऊ घातलेल्या सनबर्नचा वाद टोकाला पोचला असतानाच पेडणे तालुक्यातील मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी "गोव्यात सनबर्न हवाच.", असे स्पष्ट मत व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "गोवा हे पर्यटनस्थळ आहे. गोव्यात जर अधिकाधिक पर्यटक यायचे असतील तर ईडीएम व्हायलाच हवा. मग तो कुठे आणावा हा सरकारचा व स्थानिकांचा प्रश्न आहे. माझ्या मतदारसंघात काही सनबर्नचे वगैरे आयोजन नाही. त्यामुळे मी या विषयावर अधिक भाष्य करणार नाही. परंतु, सनबर्नसारखा ईडीएम गोव्यात होणे आवश्यक आहे."
दरम्यान, जीत यांनी वर्षभरापूर्वी पेडणे तालुक्यात सनबर्न नकोच, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळेसच्या त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. वर्षभरापूर्वी जीत म्हणाले होते की, "पेडणे ही कलाकारांची खाण आहे. संगीत क्षेत्रात नाव कमावलेले अनेक लोक येथे आहेत. सनबर्नसारखा प्रकार येथे आणल्यास त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच होईल. पेडणे तालुक्यात तरी आम्हाला सनबर्न नको.' परंतु आता जीत सनबर्नचे उघडपणे समर्थन करू लागले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मी सनबर्नपासून दूरच: सुदिन ढवळीकर
दुसरीकडे जीत हे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सनबर्नपासून आपण दूरच असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "सनबर्नचे आयोजन करणे हा सरकारचा निर्णय आहे. या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. मी मात्र माझ्या वैयक्तिक मतानुसार सनबर्नपासून दूरच राहणे पसंत करीन."
मुख्यमंत्री निर्णय घेण्यास सक्षम : रवी
कृषीमंत्री रवी नाईक यांना सनबर्नच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले की," मुख्यमंत्री या प्रश्नावर निर्णय घेण्यात सक्षम आहेत. मी याबाबत आणखी काही बोलू इच्छित नाही."
स्थानिकांतही मतभेद
दरम्यान, गेल्या काही काळापासून सनबर्नच्या विषयावरून पेडणे तालुक्यात मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. सनबर्नला पाठिंबा आणि विरोध असे चित्र दिसून येत आहे. काहीजणांनी हा तीन दिवसांचा कार्यक्रम व्हावा असे मत मांडले आहे तर सनबर्नच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार हे तालुक्याच्या संस्कृतीला बाधक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.