आई-वडिलांची मुलीसह आत्महत्या
By Admin | Updated: August 12, 2014 01:34 IST2014-08-12T01:31:13+5:302014-08-12T01:34:15+5:30
भारजुवे : मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या एकुलत्या मुलाचे अकाली निधन झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या आई-वडिलांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीसह

आई-वडिलांची मुलीसह आत्महत्या
भारजुवे : मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या एकुलत्या मुलाचे अकाली निधन झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या आई-वडिलांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना तळपवाडा-कुंभारजुवे (पुलाजवळ) येथे घडली. तिघेही गळफास लावून घरातील पंख्यांना लोंबकळत असलेली स्थानिकांना आढळून आली. कुंभारजुवे परिसरात या घटनेने खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे.
अशोक नाईक (४६), पत्नी नूतन (४०) व मुलगी दीपश्री (१३) अशी मृतांची नावे आहेत. हा प्रकार सोमवार दि. ११ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. रविवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळचे ११ वाजले, तरी नाईक यांचे घरातूनच चालविले जाणारे कॅफे नवदुर्गा हे हॉटेल उघडले नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केल्यावर ही घटना उघडकीस आली. बराच वेळ प्रयत्न करूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी जुने गोवे पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा दीपश्री, नूतन व अशोक यांनी घरातील सिलिंग फॅनला दुपट्टा व साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले.
नाईक दाम्पत्याचा मानसिकदृष्ट्या अपंग असलेला मुलगा विशालचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून नाईक कुटुंबीय मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती घटनास्थळी जमलेल्या लोकांकडून मिळाली. मुलगी दीपश्री ही माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कुलात सातवीत शिकत होती. ती अभ्यासात
हुशार होती. भावाचे निधन झाल्यामुळे
गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेला ती अनुपस्थित होती. शिवाय, २२ जुलैपासून
ती शाळेत गेली नव्हती, अशी माहिती मिळाली. आई-वडिलांना आलेल्या तीव्र नैराश्यात तिचाही बळी गेला, अशी चर्चा परिसरात सुरू होती. एक उमलती कळी हकनाक जिवास मुकल्याचे दु:खही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
दरम्यान, उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी जुने गोवे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण सिनारी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक सगुण सावंत तपास करत आहेत. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर तसेच सरपंच
सुरेंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट
देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)