सुभाष फळदेसार्इंच्या समर्थकांकडून ‘जीसीए’ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 01:43 IST2016-01-03T01:43:14+5:302016-01-03T01:43:25+5:30

सांगे : शेळपे-सांगे येथील गोवा क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या उद्घाटनाच्या कथित प्रसंगावरून शनिवारी सांगेचे आमदार

Subhash Fotardasai's supporters blamed GCA officials | सुभाष फळदेसार्इंच्या समर्थकांकडून ‘जीसीए’ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

सुभाष फळदेसार्इंच्या समर्थकांकडून ‘जीसीए’ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

सांगे : शेळपे-सांगे येथील गोवा क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या उद्घाटनाच्या कथित प्रसंगावरून शनिवारी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या समर्थकांनी गोवा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर नाईक यांना धक्काबुक्की केल्यामुळे काही काळ मैदानावर तणाव निर्माण झाला. या वेळी आमदार फळदेसाई यांनीही धमक्या दिल्या, असा दावा जीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीप्रामणे, शनिवारी या मैदानावर गोवा क्रिकेट संघटनेच्या ‘ए’ डिव्हिजनचा मडकई क्रिकेटर्सविरुद्ध कुडचडे युथ या संघांमध्ये सामना होता. मात्र, कोणी तरी सांगे मैदानाचे उद्घाटन करणार, अशी अफवा पसरविल्याने आमदार फळदेसाई तसेच त्यांचे समर्थक असलेले जीसीएचे माजी खजिनदार आणि सर्वोदय स्पोटर््स क्लब कालेचे अध्यक्ष विलास देसाई व अन्य समर्थक मैदानावर दाखल झाले. आमदारांना आमंत्रण न देता तुम्ही मैदानाचे उद्घाटन कसे करता, असा प्रश्न विचारून या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जीसीएचे उपाध्यक्ष मनोहर नाईक तसेच माध्यम विभागाचे अध्यक्ष केतन भाटीकर व अन्य आयोजक या वेळी मैदानावर उपस्थित होते. नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विलास देसाई यांनी आपल्याला धक्काबुक्की केली व कॉलरला पकडले. आमदारांनीही या वेळी धमक्या दिल्या. त्यांच्या समर्थकांनी शिव्यांचा भडीमार केला. वास्तविक शनिवारी या मैदानाचे उद्घाटन नव्हतेच. केवळ अ विभागाचा सामना होता. या संदर्भात पोलीस तक्रार केलेली नाही, असे नाईक म्हणाले.
जीसीएचे माध्यम विभागाचे अध्यक्ष केतन भाटीकर म्हणाले की, आमदार फळदेसाई यांचे वर्तन आक्षेपार्ह होते आणि झालेली घटना एकदम खेदजनक होती. फळदेसाई यांनी मैदानावर जे वर्तन केले, ते एका आमदाराला शोभण्यासारखे नव्हते. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, सांगेच्या या मैदानावर यापूर्वी ५ कामगारांची नेमणूक केली होती. मात्र, जीसीएने हल्लीच त्या स्थानिक कामगारांना कामावरून काढून टाकून त्या जागी वास्को येथील कामगारांची भरती केली आहे. यामुळेही हा वाद अदिक भडकला, असे सांगण्यात येते. या ५ कामगारांसाठीच आपण जीसीएच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता, हा वाद झाला. हे कामगार भाजपाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचा दावा आमदार फळदेसाई यांनी केला. हा गोंधळ बराच वेळ चालू होता. शेवटी आमदारांनीच उद्घाटन केल्यानंतर हा सामना सुरळीतपणे पार पडला. (खास प्रतिनिधी)

Web Title: Subhash Fotardasai's supporters blamed GCA officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.