विद्यार्थी तणावाखालीच
By Admin | Updated: November 26, 2015 01:37 IST2015-11-26T01:36:54+5:302015-11-26T01:37:12+5:30
पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही समांतर चित्रपट महोत्सव घेतला. पोलीस

विद्यार्थी तणावाखालीच
पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही समांतर चित्रपट महोत्सव घेतला. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या चित्रपट महोत्सवास ज्येष्ठ
दिग्दर्शक सईद मिर्झा, तसेच इफ्फीतील काही प्रतिनिधींनीही आवर्जून उपस्थिती लावली.
समांतर चित्रपट महोत्सवासाठी पुढाकार घेतलेला एफटीआयआयचा माजी विद्यार्थी प्रतीक वत्स ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला की, आम्ही इफ्फीत तसेच आजूबाजूला वावरतोय; परंतु पोलीस कधी हात टाकतील याचा नेम नाही. भीतीच्या वातावरणाखालीच वावरावे लागत आहे. शहरात जमावबंदीसाठी १४४ कलम लागू केलेली असल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे.
समांतर चित्रपट महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करताना प्रतीक म्हणाला की, यामुळे विद्यार्थ्यांनाही स्फूर्ती मिळाली. संस्थेत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे चित्रपट तयार केले आहेत. इफ्फीत आमचे चित्रपट डावलले असली तरी लोकांना ते हवे आहेत. गेली दहा वर्षे मी इफ्फीत येतोय, परंतु इतका वाईट अनुभव कधीच आला नाही. चित्रपट तयार करणे किंवा चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होणे हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे; परंतु या गोष्टींपासून आम्हाला डावलण्यात आले. प्रतीक याने दिलेल्या माहितीनुसार एफटीआयआयचे १५ आजी, माजी विद्यार्थी सध्या गोव्यात आहेत. समांतर चित्रपट महोत्सवानंतर आता परतणार काय, असे विचारले असता तसे काही ठरलेले नाही. इफ्फीत पत्रके वाटून आम्ही आमचे म्हणणे सिनेसृष्टीशी संबंधित लोकांपर्यंत पोचवणार आहोत, असे त्याने सांगितले. येथील इन्स्टिट्यूट पिएदाद सभागृहात बुधवारी या चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेले दहा चित्रपट दाखवण्यात आले. अनुचित घटना घडू नये यासाठी संस्थेच्या सभागृहाच्या आवारात दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)