राज्यात अनेकांना करोडोंचा गंडा
By Admin | Updated: November 24, 2014 01:28 IST2014-11-24T01:25:25+5:302014-11-24T01:28:59+5:30
कित्येक कारनामे उघड : फ्लॅट विक्रीचा बहाणा, सरकारी नोकरीच्या आमिषानेही चुना

राज्यात अनेकांना करोडोंचा गंडा
सूरज पवार-मडगाव : ठग मोकाट सुटले आहेत. मूळ पुणे येथील जयंत नलावडे याने आतापर्यंत अनेकांना करोडोंचा चुना लावला आहे. नलावडे व त्याच्या सहकाऱ्यांविरुध्द मडगाव पोलीस ठाण्यातच पाच गुन्हे नोंद आहेत.
या भामट्यांनी पाच प्रकरणांत गुंतवणूकदारांना तब्बल ३ कोटी ३४ लाखांचा गंडा घातला आहे. रूपेश शेटकर व प्रथमेश सांवत हे पोलिसांना चकवा देत आहेत. या दोघांनी आतापर्यंत अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसविले आहे.
नलावडेला एका प्रकरणात मडगाव पोलिसांनी अटक केली होती. मागाहून तो जामिनावर सुटला होता, त्यानंतर आतापर्यंत पोलीस त्याला गजाआड करू शकले नाहीत. रूपेश शेटकर याचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, तोही अद्याप पोलिसांच्या बेड्यांपासून कोसो दूर आहे.
नलावडेचे सध्या दिल्लीमध्ये बस्तान असल्याचे वृत्त आहे. पोलीसही त्याला दुजोरा देत आहेत. मात्र, त्याला अटक होत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकाऱ्यांनीही नलावडेकडे गुंतवणूक केली होती. मध्यंतरी त्याला अटक केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी आपली रक्कम त्याच्याकडून वसूल करून घेतली होती.
माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०१३ साली नलावडे याच्या विरुध्द या पोलीस ठाण्यात पहिली तक्रार पेर-सुरावली येथील जोसेफिना फर्नांडिस या महिलेने दिली होती.
नलावडे व कालकोंडा येथील विनोद धमकले ऊर्फ कामत या दोघांविरुध्द ही तक्रार असून, मडगाव पोलिसांनी भादंसंच्या ४१८, ४१९ व ४२० कलमांखाली हे प्रकरण नोंदवून गुन्हाही नोंद केला होता.
२०१२ साली संशयितांनी फर्नांडिस यांना ९५ लाखांचा गंडा घातला होता. फातोर्डा येथील सुमन रेसिडेन्सीत रो हाउस विकत देण्याचे असल्याचे सांगून संशयितांनी तिच्याकडून रक्कम उकळली होती. धमकले याने फर्नांडिस याची नलावडेशी गाठ घालून सौदा पक्का केला होता. रो हाउससाठी फर्नांडिस यांनी आपला बंगला विकून मागाहून रक्कम नलावडेला दिली होती.
२०१२ सालच्या जुलै ते आॅगस्ट या दरम्यान संशयितांना तक्रारदाराने रक्कम दिली होती. मात्र, वायद्यानुसार त्याच वर्षाच्या आॅक्टोबरपर्यंत रो-हाउस मिळाला नसल्याने आपण फसलो गेले हे लक्षात आल्यानंतर मागाहून फर्नांडिस यांनी मडगाव पोलीस ठाणे गाठले होते.
१३ डिसेंबर २०१३ साली जयंत नलावडे व अशोक मळकर्णेकर या दोघांविरुध्द आणखीन एक फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. लोटली येथील जोसेफ थॉमस वाझ ऊर्फ जे. टी. वाझ यांनी ही तक्रार केली होती. घोगळ-मडगाव येथील कोरगावकर हेरिटेजमधील एका इमारतीतील फ्लॅट विकण्याचे असल्याचे सांगून वाझ यांना १५ लाखांचा गंडा घालण्यात आला होता.
रक्कम फेडूनही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याचे बघून वाझ यांनी या इमारतीच्या बिल्डरची भेट घेतली असता तो फ्लॅट अन्य एकाने पूर्वीच बुक केला असल्याचे आढळून आल्यानंतर वाझ यांना धक्काच बसला होता.
सांतिमळ-राय येथील सेबेस्तियो सिक्वेरा यांनी ३१ डिसेंबर २०१३ साली मडगाव पोलीस ठाण्यात जयंत नलावडे व अशोक मळकर्णेकर या दोघांविरुध्द एक तक्रार नोंद केली होती. या तक्रारीत आपली नातेवाईक क्लिंसिया मिनेझिस हिला या संशयितांना कामुर्ली येथे रो-हाउस घेऊन देऊ असे सांगून तिच्याकडून ३२ लाख उकळले होते, असे म्हटले आहे.
पुणे येथील लुडविक बार्रेटो या ज्येष्ठ नागरिकाला नलावडे व विनोद धमकले या दोघांनी रो-हाउस विकत देऊ असे सांगून ४५ हजारांचा गंडा घातला आहे. व्यवसायाने विमा एजंट असलेले प्रेमानंद च्यारी यांनाही नलावडे यांनी ९७ लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे.
च्यारी हे नलावडे यांच्याकडे विमा उतरविण्यासाठी गेले असता, त्यांनी आपल्याला गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आपण आपल्या मित्राकडून पैसे उधार घेऊन नलावडे याच्याकडे ९७.५० लाखांची गुंतवणूक केली.
एका वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मात्र, नलावडेकडून आपल्याला मूळ रक्कमही अदा झाली नाही, अशी तक्रार च्यारी यांनी मडगाव पोलिसात नोंदविली आहे.
मालभाट येथे नलावडे याने आलिशान कार्यालय थाटले होते. त्याचे काही सहकारी
आलिशान गाड्या घेऊन वावरत आहेत. नलावडे सध्या फरार आहे. लाखोंची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार सध्या आपल्याला न्याय कधी मिळेल, या आशेवर
आहेत.