मलेरिया, डेंग्यूचे राज्यभर थैमान
By Admin | Updated: July 9, 2015 01:09 IST2015-07-09T01:09:25+5:302015-07-09T01:09:37+5:30
पणजी : राज्यात जून महिन्यात मलेरियाचे १८८, तर डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळले आहेत. पणजी, मडगाव, कांदोळी येथील भागात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे

मलेरिया, डेंग्यूचे राज्यभर थैमान
पणजी : राज्यात जून महिन्यात मलेरियाचे १८८, तर डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळले आहेत. पणजी, मडगाव, कांदोळी येथील भागात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तसेच वाळपई, कुडतरी, शिरोडा इत्यादी ग्रामीण क्षेत्रातही डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळले आहे. मात्र, गतवर्षी जून महिन्यात आढळलेल्या रुग्णांपेक्षा यंदा हे प्रमाण बरेच
कमी आहे.
उत्तर गोव्यात एकाच परिसरात मोठ्या प्रमाणात मलेरिया किंवा डेंग्यूचे रुग्ण आढळले नाहीत. पणजी, कांदोळी, मडगाव, वास्को शहरात विविध परिसरात मिळून आकडेवारी दिली आहे.
राज्यातील ग्रामीण भागात डेंग्यू वाढत आहे. याचे प्रमुख कारण साठवण्यात येणारे पाणी असू शकते. पावसाचे पाणी साठून राहात असल्यामुळे मलेरियाच्या डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊ शकते. यासाठी नागरिकांनी दक्ष राहून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. चंद्रकांत परब यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २0१३ साली जून महिन्यात १५३0 मलेरियाचे रुग्ण आढळले होते, तर २0१४ साली ८२४ रुग्ण आढळले.
२0१३ साली डेंग्यूचे १९८, तर २0१४ साली १६८ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. दरवेळी पावसाळ्यात मलेरिया रुग्णांची संख्या वाढू लागते. ज्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रे आहेत, तिथे मजुरांमध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे परराज्यातून येणाऱ्या मजुरांना आरोग्य कार्ड करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रमाणात आढळले आहेत.
काही भागात वीसपेक्षा जास्त संख्येने रुग्ण आढळले आहेत, तर काही भागात एक-दोन असे रुग्ण आढळले आहेत.
प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, तसेच मलेरिया, डेंग्यूसारखी लक्षणे दिसताच योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. परब म्हणाले.
(प्रतिनिधी)