राज्य सहकारी बँक आता गोव्यापुरतीच
By Admin | Updated: December 28, 2015 01:34 IST2015-12-28T01:33:34+5:302015-12-28T01:34:25+5:30
पणजी : राज्य सहकारी बँकेच्या रविवारी झालेल्या आमसभेत दमण, दिव व दादरा नगर हवेली भागातील नऊ शाखा

राज्य सहकारी बँक आता गोव्यापुरतीच
पणजी : राज्य सहकारी बँकेच्या रविवारी झालेल्या आमसभेत दमण, दिव व दादरा नगर हवेली भागातील नऊ शाखा बँकेपासून अलिप्त करण्याचा ठराव रविवारी झालेल्या आम सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे बँकेला बहुराज्याचा दर्जा आता गमवावा लागला. दमण, दिवच्या ४00 कोटी रु. ठेवी बँकेकडे आहेत त्यातील ११0 कोटी रुपये गरज पडेल त्यानुसार परत केल्या जातील.
गोवा हे स्वतंत्र राज्य असल्याने तसेच दमण, दिव व दादरा नगर हवेली हे भाग वेगळे असल्याने विभाजन करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले होते. मात्र, त्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. हे प्रकरण गंभीरपणे घेऊन येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले असता विद्यमान संचालक मंडळाने मुदत वाढवून मागितली.
बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मालमत्तेतील काही वाटाही दमण, दिव व दादरा नगर हवेलीतील बँकांना मिळणार आहे. त्यानुसार मुख्यालय इमारतीतील १0 टक्के वाटा दिला जाईल. बहुराज्य दर्जामुळे अनेक गोष्टी अडल्या होत्या. गेल्या पाच वर्षांच्या काळात तब्बल ४१ कोटी रुपये तोटा बँकेला सहन करावा लागला. आता हा दर्जा गेल्याने कृषी, डेअरी, पर्यटन, व्यवसायासाठी वाहन खरेदी याकरिता नाबार्डकडून कमी व्याजाने पैसे उचलून गरजूंना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाबार्डच्या ‘नाफकोन्स’ या संस्थेने बँकेच्या एकूण व्यवहाराबाबत अहवाल तयार केला होता तो आमसभेसमोर ठेवण्यात आला. १९८७ साली गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला तेव्हाच पुनर्रचना होणे आवश्यक होती; परंतु ते झाले नाही. रिझर्व्ह बँकेने २00५ साली आदेश दिले होते; परंतु त्या वेळच्या व्यवस्थापनाला बँक राज्य निबंधकांच्या नियंत्रणाखाली आलेली नको होती आणि त्यामुळेच घोटाळ्यांचा मार्ग मोकळा झाला, असा आरोप फळदेसाई यांनी केला. (प्रतिनिधी)