पणजी : खाण भागात वाहतूक करणा-या ट्रकांमुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणा-या मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात होणार आहे. साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दीपक पाऊसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात गुड्डेमळ ते कापशे या 100कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. खनिजवाहू ट्रकांनी मुख्य रस्ते वापरू नयेत यासाठी त्यांच्यासाठी मायनिंग कॉरिडोर असून, वेगळे रस्ते बांधले जातील. खाणपट्ट्यात मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण त्यामुळे कमी होईल.पाऊसकर म्हणाले की, तिळामळ ते रिवण भागातील रस्त्यांचे काम अडले आहे. या भागातील खाण लिजेस् पर्यावरणीय परवान्यांसाठी रखडल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मायनिंग कॉरिडोरसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत लवकरच बैठक घेतील. खाणमालकांकडून जमा केलेल्या जिल्हा खनिज निधीतून की राज्य किंवा केंद्र सरकारच्या निधीतून हे काम केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.वन खात्याकडून या प्रकल्पासाठी लवकरच ना हरकत दाखला दिला जाणार आहे. खाणपट्ट्यासाठी मायनिंग कॉरिडोरची संकल्पना 2011 साली दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री असताना आणली होती. परंतु खाण कंपन्यांनी निधी देण्यास नकार दिल्याने हे काम रखडले. त्यानंतर 2012 साली खाणबंदी आली. खाणींपासून जेटींपर्यंत खनिज वाहतूक करणारे ट्रक या मायनिंग कॉरिडोर उपयुक्त ठरणार आहे. गोव्यात ज्या चार ते पाच तालुक्यांमध्ये खाणी आहेत, तेथे खनिज वाहतूक करणारे हजारो ट्रक पूर्वी कार्यरत होते. आता खाणींच्या संख्येवर मर्यादा आल्याने ट्रकही कमी झालेले आहेत. खाणपट्ट्यात वाहतूक करणा-या ट्रकांसाठी मायनिंग कॉरिडोर उपयुक्त ठरणार आहे.
गोव्यात मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात, गुड्डेमळ ते कापशे 100 कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:45 IST