युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 09:44 IST2025-02-19T09:43:13+5:302025-02-19T09:44:39+5:30
'फिट फॉर लाईफ' आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा हे स्पोर्टस् डेस्टिनेशन म्हणून अस्तित्वात येत आहे. राज्यात खासकरून क्रीडा खाते पारंपरिक खेळांना प्राधान्य देत असून त्यांचा प्रसार व प्रचार करण्यावर भर असल्याचे पाहून आनंद होत आहे. युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा असून सरकार क्रीडा क्षेत्र आणखी विकसित करण्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, मणिपूर यांच्यातर्फे गोवा विद्यापीठ आणि डॉन बॉस्को विद्यालय, पणजी यांच्या साहाय्याने गोवा विद्यापीठात १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत 'फिट फॉर लाईफ' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक आधुनिक साधनसुविधा राज्यात तयार झालेली आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन येथे सातत्याने होत आहे. खेळ हा केवळ आरोग्यासाठी चांगला नाही, तर खेळामुळे माणसांचे चारित्र्य सुधारते, शिस्त लागते, माणुसकी निर्माण होते. एवढेच नाही तर देशभक्ती व एकता वाढते. त्यामुळे फिट फॉर लाईफ हा मंत्र लक्षात घेत सर्वांनी वावरले पाहिजे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
राज्य व देशातील क्रीडा क्षेत्र विकसित होत असताना, देशातील प्राचीन पारंपरिक खेळांना देखील महत्त्व प्रदान करून देणे तेवढेच गरजेचे आहे. खो-खो, कबड्डी, कलारयीपटू यासारखे खेळ जपणे आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख करून देणे हे आवश्यक असून, मला हे सांगताना आनंद होत आहे की, आमचे सरकार यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.