राज्यात फार्मसींचा उत्स्फूर्त बंद
By Admin | Updated: October 15, 2015 02:19 IST2015-10-15T02:18:15+5:302015-10-15T02:19:03+5:30
पणजी : राज्यातील सर्व खासगी फार्मसी बुधवारी देशव्यापी संपात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने औषध विक्री होऊ शकली नाही

राज्यात फार्मसींचा उत्स्फूर्त बंद
पणजी : राज्यातील सर्व खासगी फार्मसी बुधवारी देशव्यापी संपात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने औषध विक्री होऊ शकली नाही. बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन आॅफ
गोवा या संघटनेने केला आहे. सरकारी व खासगी इस्पितळांमधील फार्मसी मात्र पूर्वघोषणेनुसार चालू होत्या, त्यामुळे रुग्णांना थोडा दिलासा मिळाला.
ग्रामीण भागात औषधांसाठी रुग्णांना मनस्ताप झाला. राज्यातील ७५0 औषध विक्रेते तसेच २00 घाऊक औषध वितरकांनी बंद पाळल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष प्रसाद तांबा यांनी केला. ते म्हणाले की, लोकांना आम्ही आधीच आवाहन केल्याने अनेकांनी आधीच औषधे खरेदी केली होती. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली नाही. लोकांनीही सहकार्य केले. सरकारने या संपातून आता तरी बोध घ्यावा आणि आॅनलाईन औषध विक्रीला दिलेली मान्यता मागे घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आॅनलाईन औषध विक्रीला केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट यांचा विरोध आहे. या फार्मसींना पाठवल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शन्सचा खरे-खोटेपणा कोण तपासणार, असा सवाल करण्यात येत आहे. बेकायदा औषध विक्रीला वाव मिळेल, कमी दर्जाची तसेच ब्रॅण्डेड नसलेली औषधे बाजारात येतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इस्पितळांमध्ये उपचारांसाठी दाखल केलेल्या रुग्णांची परवड होऊ नये यासाठी सरकारी आणि खासगी इस्पितळांच्या फार्मसींना बंदमधून वगळण्यात आले होते. बाजारातील खासगी फार्मसी बंद राहिल्याने काही लोकांनी इस्पितळांच्या फार्मसींमधून औषधे खरेदी केली.
(प्रतिनिधी)