पार्सेकरांच्या आक्षेपानंतरही सोपटेंना भाजपमध्ये प्रवेश?

By Admin | Updated: June 18, 2014 07:24 IST2014-06-18T07:24:32+5:302014-06-18T07:24:44+5:30

पणजी : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्यास

Sopertna admits BJP after Parsekar's objection? | पार्सेकरांच्या आक्षेपानंतरही सोपटेंना भाजपमध्ये प्रवेश?

पार्सेकरांच्या आक्षेपानंतरही सोपटेंना भाजपमध्ये प्रवेश?

पणजी : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्यास आक्षेप असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली. मात्र, पार्सेकर यांच्या आक्षेपानंतरही सोपटे यांना पक्ष प्रवेशाचा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न काहीजण करत असून त्यात त्यांना यश येऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली.
यापूर्वी अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यात डॉ. सुरेश आमोणकर, प्रकाश फडते, अ‍ॅड. रमाकांत खलप, रवी नाईक, पांडुरंग राऊत, रमाकांत आंगले, मिकी पाशेको, बाबूश मोन्सेरात आदींचा समावेश आहे. या काही नेत्यांपैकी बहुतेकजण हे भाजपमध्ये थांबण्यासाठी आले नव्हतेच. ते मुळातच बिगरभाजप असे नेते होते. बहुतांशजण काँग्रेसमधून आले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षाला त्याबाबत जास्त दु:ख झाले नाही.
दिगंबर कामत, राजेश पाटणेकर व दयानंद सोपटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली, त्या वेळी मात्र भाजपला जास्त दु:ख झाले, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. पाटणेकर, सोपटे, कामत वगैरे भाजपमध्येच तयार झाले होते व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह पक्षातील अनेकांना धक्का बसला. यापैकी कामत यांचा राजकीयदृष्ट्या फायदा झाला. त्यांना काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लगेच मुख्यमंत्रिपद मिळाले. सोपटे किंवा पाटणेकर यांना मात्र भाजपला सोडचिठ्ठी देणे राजकीयदृष्ट्या संकटात नेणारे ठरले.
सोपटे हे एकेकाळी मंत्री पार्सेकर व भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांचे शिष्य मानले जात होते. नंतर अचानक त्यांनी काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांचे शिष्यत्व पत्करले. सोपटे यांचा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश झाला असता. तथापि, मंत्री पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने त्यांचा प्रवेश अडला होता.
जे पक्ष सोडून जातात, त्यांचे बाहेर साधले नाही की मग त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येणे व पक्षाने त्यांचे स्वागत करणे हा चुकीचा पायंडा ठरेल, अशा भावना मंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी भाजपच्या श्रेष्ठींना कळविल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता पार्सेकर यांचा विरोध असतानाही सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळू शकतो.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Sopertna admits BJP after Parsekar's objection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.