मांडवी नदीत लवकरच तरंगते हॉटेल
By Admin | Updated: December 15, 2014 01:23 IST2014-12-15T01:17:23+5:302014-12-15T01:23:35+5:30
गोव्यातील पहिले फ्लॉटेल : चौदा खोल्या, १३ मीटर लांबी, ६० प्रवासी क्षमता

मांडवी नदीत लवकरच तरंगते हॉटेल
सद्गुरू पाटील-पणजी : मांडवी नदीत आता यापुढे गोव्यातील पहिले फ्लॉटेल पाहायला मिळणार आहे. चौदा खोल्या, तेरा मीटर लांबी व साठ प्रवासी क्षमता असलेले हे हॉटेल तथा फ्लॉटेल बांधून तयार आहे. यापुढील काळात ते मांडवीत तरंगताना पाहायला मिळेल.
विजय मरीन शिपयार्डने या फ्लॉटेलचे डिझाईन तयार करून पूर्ण बांधणी केली आहे. पेंग्विनच्या आकाराचे फ्लॉटेल म्हणजे पाण्यावर तरंगणारे हॉटेल. एकाच वेळी हॉटेल व प्रवासी वाहतूक करणारे जहाज अशा दोन रूपांत ते आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यावर हेलिपॅडही असेल. अत्यंत उच्च दर्जाचे व जगातील अत्यंत श्रीमंत असे पर्यटक या फ्लॉटेलमध्ये येतील, असे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनेच फ्लॉटेलची रचना आहे. आत खूप आरामदायी वातावरण असेल. स्पा, जाकुझी हॉट टब्स, व्हीआयपी पाहुण्यांसाठी सुट, अशी याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. विजेची गरज भागविण्यासाठी ३३० केव्ही क्षमतेचे जनरेटरही आत असतील, असे सूत्रांनी सांगितले.
एकाच जागेवर नांगरून न ठेवता फ्लॉटेल नदीत फिरविले जाईल. नेमके कधीपासून फ्लॉटेल सुरू होईल व मांडवीत येईल ते स्पष्ट झालेले नाही. संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावरही त्याबाबतचे सुतोवाच आहे. पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांच्या स्वागताची भूमिका सरकारने घेतली आहे.