काही मंत्र्यांना चतुर्थीपूर्वी ‘नारळ’

By Admin | Updated: June 18, 2015 01:48 IST2015-06-18T01:48:46+5:302015-06-18T01:48:56+5:30

पणजी : राज्य मंत्रिमंडळाची येत्या चतुर्थीपूर्वी फेररचना केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Some cabinet ministers 'coconut' before Chaturthi | काही मंत्र्यांना चतुर्थीपूर्वी ‘नारळ’

काही मंत्र्यांना चतुर्थीपूर्वी ‘नारळ’

पणजी : राज्य मंत्रिमंडळाची येत्या चतुर्थीपूर्वी फेररचना केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारने सहा महिन्यांचा कालावधी नुकताच पूर्ण केला आहे. सरकारच्या काही खात्यांची कामगिरी सुधारत नाही, याची कल्पना भाजपलाही आली आहे. भाजपचे निरीक्षक गेल्या आठवड्यात तीन दिवस गोव्यात होते. पुढील सहा महिने संपल्यानंतर २०१६ साली निवडणूक वर्ष सुरू होणार आहे. पूर्वी जानेवारी २०१६मध्ये मंत्रिमंडळाची फेररचना करावी, असा सरकारचा विचार होता. तथापि, आता चतुर्थीपूर्वीच मंत्रिमंडळ फेररचना करून काही खात्यांच्या कारभाराला गती द्यावी, असा विचार सुरू झाला आहे. तूर्त तरी मंत्रिमंडळाची फेररचना नाही, असे उत्तर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून ऐकायला मिळाले; पण चतुर्थीपूर्वी फेररचना होण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा भाजपच्या काही आमदारांमध्ये व काही मंत्र्यांमध्येही आहे.
आमदार मिकी पाशेको यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत ते पद भरले गेलेले नाही. पाशेको यांना सहा महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही, अशी माहिती मिळाली. भाजपच्याच अधिकाधिक आमदारांना मंत्रिपदे द्यावीत व निवडणुकीस स्वबळावर सामोरे जावे, अशा प्रकारचा विचार भाजपमध्ये हळूहळू पक्का होऊ लागला आहे. २०१७च्या निवडणुकीवेळी भाजपची मगो पक्षाशी युती होणार नाही.
मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्याच्या नावाखाली यापूर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच निरीक्षक व्ही. सतीश यांनी भाजपच्या काही मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या खात्यांची प्रगती जाणून घेतली आहे. रिपोर्ट कार्ड तयार झाले नाही; पण कोणता मंत्री कुठे कमी पडत आहे, याची कल्पना मुख्यमंत्र्यांनाही आली आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Some cabinet ministers 'coconut' before Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.