लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीची कामे जरी डोकेदुखी ठरत असली तरीही स्मार्ट बस खऱ्या अर्थाने पणजीवासीयांसाठी आनंदी प्रवास घेऊन आल्या आहेत. वातानुकूलित स्मार्ट बसद्वारे पणजी, तसेच सभोवतालच्या परिसरात २० रुपयांत प्रवास केला जाऊ शकतो.
कदंब महामंडळाअंतर्गत ही स्मार्ट बससेवा पणजीत जुलै महिन्यात सुरू झाली आहे. सध्या १५ च्या आसपास स्मार्ट बस कार्यरत असून, दर १५ ते २० मिनिटांनी त्या पणजी बसस्थानकांवरून आपल्या नियोजित ठिकाणी सोडल्या जातात. जुलै ते सप्टेंबर या काळात ४ लाखांहून अधिक प्रवाशांनी या बसद्वारे प्रवास केला होता.
पणजीत अनेक वर्षांपासून खासगी बससेवा असली तरी त्या शहरातील अंतर्गत भागांत ही सेवा नाही. मात्र, स्मार्ट सिटीच्या बस प्रवाशांना अंतर्गत भागांतही प्रवास घडवत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरत आहे.
प्रवासात १० टक्के सूट
मिरामार, पणजी - दोनापावला, पणजी - ताळगाव, पणजी-आल्तिनो, पणजी - सांताक्रूझ, पणजी - बांबोळी या मार्गावर या बस सध्या कार्यरत आहेत. सुरुवातीला केवळ आठ बस होत्या, तर आता त्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एकूण ४२ बस शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत सेवा देणार असून, लवकरच इतरही बस सेवेत दाखल होतील. प्रवास अधिक सुखमय व्हावा यासाठी आता स्मार्ट पासचीही सुरुवात केली असून, तिकिटावर १० टक्के सूटही दिली जात आहे.