झोपा काढणाऱ्या संरक्षणमंत्र्यांनी पेपरफुटीवर बोलावे - काँग्रेस
By Admin | Updated: February 27, 2017 18:54 IST2017-02-27T18:54:06+5:302017-02-27T18:54:06+5:30
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे अनेकदा झोपा काढत असतात. सैन्य भरतीवेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण हे खूप मोठे आणि खूप गंभीर असे आहे.

झोपा काढणाऱ्या संरक्षणमंत्र्यांनी पेपरफुटीवर बोलावे - काँग्रेस
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे अनेकदा झोपा काढत असतात. सैन्य भरतीवेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण हे खूप मोठे आणि खूप गंभीर असे आहे. याबाबत पर्रीकर यांनी बोलावे, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.
सोमवारी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्या उपस्थितीत विधानसभा प्रकल्पातील विरोधी पक्षनेत्याच्या कक्षामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा घोटाळे होत असल्याचे पर्रीकर म्हणायचे. आता जो घोटाळा घडलाय तो बराच मोठा असून संरक्षणमंत्र्यांनी त्याविषयी बोलावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५६ इंच छातीच्या गोष्टी बोलतात. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या संरक्षण दलातील सैन्य भरती प्रकरणाकडे जर पाहिले तर ५६ इंच छातीच्या गोष्टी त्यांनी न बोललेल्या बरे असे वाटते.
सैनिक भरती पेपर फुटीच्या प्रकरणाचा गोव्याशीही संबंध आला आहे. गोव्यातही वाटाघाटी झाल्याचे तपासावेळी दिसून आले. पर्रीकर यांनी एकूण प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी बोलायलाच हवे. त्यांना संरक्षणमंत्री पदावरून काढण्याची मागणी अजून आम्ही केलेली नाही; तशी मागणी केली तरी देखील ते कमीच होईल, असे रेजिनाल्ड यांनी नमूद केले.