खारफुटीची कत्तल; कंत्राटदार अटकेत
By Admin | Updated: November 29, 2014 01:01 IST2014-11-29T00:58:53+5:302014-11-29T01:01:12+5:30
पणजी : दिवाडी येथे एका बांंधकामासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी कापण्याचा प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आल्यावर गोवा किनारपट्टी

खारफुटीची कत्तल; कंत्राटदार अटकेत
पणजी : दिवाडी येथे एका बांंधकामासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी कापण्याचा प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आल्यावर गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने नोंदविलेल्या तक्रारीनुसार जुने गोवे पोलिसांनी कारवाईत वासुकी शेट नामक कंत्राटदाराला अटक केली.
एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने या प्राधिकरणाकडे तसेच बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि अन्य संबंधित यंत्रणांकडे यासंबंधी तक्रार केली होती. या पर्यावरणप्रेमीने खारफुटीच्या कत्तलीचे चित्रीकरण करून सीडीही सरकारी यंत्रणांना पाठवली होती. प्राधिकरणाने डॉ. आंतोनियो मास्कारेन्हस तसेच नितीन सावंत या दोन तज्ज्ञांना चौकशीसाठी नेमले असता, मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले. मध्यंतरी काही दिवस हे काम बंद होते; परंतु शुक्रवारी त्या ठिकाणी मजूर खारफुटी कापत असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वासुकी शेट या कंत्राटदाराला १९८६च्या पर्यावरण संवर्धन कायद्याच्या कलम १५खाली अटक केली. आपण राव नामक व्यक्तीसाठी हे काम करीत होतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. जुने गोवेचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण सिनारी यांनी यास दुजोरा दिला.
गोवा किनारपट्टी व्यवस्थापन सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले यांना विचारले असता, प्राधिकरणाने पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यानुसार आता कारवाई झालेली आहे, असे सांगितले. दिल्लीतील एक बडा उद्योजक या ठिकाणी हॉटेल बांधत असल्याची माहिती मिळते.
स्थानिक ग्रामपंचायतीकडून साफसफाईसाठी म्हणून परवानगी घेण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात तेथे खारफुटी कापण्याचे काम चालले होते.
दरम्यान, वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)