श्रीपाद नाईक यांची आगामी निवडणूक शेवटची
By काशिराम म्हांबरे | Updated: March 5, 2024 17:31 IST2024-03-05T17:29:42+5:302024-03-05T17:31:24+5:30
पाच वर्षानंतर होणाऱ्या २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नवा तसेच युवा चेहऱ्याला प्राधान्य द्यावे अशी विनंती आपण पक्षाकडे करणार असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकारांना दिली.

श्रीपाद नाईक यांची आगामी निवडणूक शेवटची
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आगामी लोकसभेची निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे संकेत दिले आहेत.
पाच वर्षानंतर होणाऱ्या २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नवा तसेच युवा चेहऱ्याला प्राधान्य द्यावे अशी विनंती आपण पक्षाकडे करणार असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकारांना दिली. म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा पक्ष कार्यालयात पत्रकारांची ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार केदार नाईक, मायकल लोबो, माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दोन दिवसापूर्वीच पक्षाने श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी देऊन पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच सोपवलेल्या जबाबदारी बद्दल श्रीपाद नाईक यांनी यावेळी पक्षाचे आभार मानले. तसेच पाच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असेही नाईक यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली.