अधिवेशनांचा कालावधी कमी होतोय ही चिंतेची बाब: ओम बिर्ला, गोव्याच्या कामगिरीचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:10 AM2023-06-16T10:10:11+5:302023-06-16T10:11:09+5:30

गोवा भेटीवर आलेले बिर्ला यांनी विधानसभेच्या सभागृहात लोकप्रतिनिधींना संबोधित केले.

shortening duration of conventions a matter of concern says om birla and praises goa performance | अधिवेशनांचा कालावधी कमी होतोय ही चिंतेची बाब: ओम बिर्ला, गोव्याच्या कामगिरीचे कौतुक

अधिवेशनांचा कालावधी कमी होतोय ही चिंतेची बाब: ओम बिर्ला, गोव्याच्या कामगिरीचे कौतुक

googlenewsNext

पणजी : "विकसित भारत : २०४७ चे उद्दिष्ट गोवा सरकार सर्वांत आधी गाठेल, असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. त्याच वेळी देशभरात विधानसभांचे कामकाज कमी दिवस चालते, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करीत गोव्यात मात्र ४० दिवस कामकाज होते, ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले.

गोवा भेटीवर आलेले बिर्ला यांनी आज विधानसभेच्या सभागृहात आजी- माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना 'विकसित भारत २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका या विषयावर संबोधले. सर्व सातही विरोधी आमदारांनी बिर्ला यांच्या भाषणावर बहिष्कार घातला. व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

बिर्ला म्हणाले की, कायदे बनविताना विधानसभेत व्यापक चर्चा व्हायला हवी. जनतेला अधिकार देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कायदे बनवतो तेव्हा चर्चा ही व्हायलाच हवी. आजकाल कामकाजाचे दिवस कमी होत चालले आहेत हे योग्य नव्हे. विधानसभेत जेवढी जास्त चर्चा होईल तेवढे चांगले कायदे निर्माण होतील. लोकप्रतिनिधींनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जनतेशी संवाद वाढवावा. गोवा लहान राज्य आहे म्हणून येथील लोकांच्या अपेक्षाही कदाचित जास्त असतील; परंतु त्यातूनही प्राथमिकता निवडा आणि पढे जा असे आवाहन बिर्ला यांनी केले. लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. 'विरोधासाठी विरोध नको' ते म्हणाले की, आजकाल केवळ विरोधासाठी विरोध करण्याची नवीन प्रवृत्ती आली आहे. सरकारच्या धोरणावर टीका केली जाते; परंतु टीका करणाऱ्यांनी धोरणांची अंमलबजावणी योग्यरीत्या कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शनसुद्धा करायला हवे.

मोदींचे स्वप्न आम्ही पूर्ण करु: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी आपल्या भाषणात बिर्ला यांची स्तुती केली. ते म्हणाले की, लोकसभेचे कामकाज ते ज्या पद्धतीने हाताळतात ते उल्लेखनीय आहे. याआधी नवीन विधानसभा संकुलात माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनी लोकप्रतिनिधींना संबोधले होते. त्यानंतर प्रथमच लोकसभेचे अध्यक्ष संबोधत आहेत. पहिले मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर, पहिले सभापती पां. पु. शिरोडकर, दिवंगत मनोहर पर्रीकर; तसेच विधानसभेत सर्वाधिक काळ आमदार, मुख्यमंत्री, मंत्री म्हणून काम केलेले प्रतापसिंह राणे यांचे योगदान गोव्याच्या विकासासाठी अतुलनीय आहे. मोदीजींचे 'आत्मनिर्भर भारत' स्वप्न आम्ही पूर्ण करू.

तीन मंत्र्यांची अनुपस्थिती

बांधकाममंत्री नीलेश काब्राल, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे लोकसभापती बिर्ला यांच्या भाषणावेळी अनुपस्थि राहिले. अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्ही फिरकले नाहीत. सात विरोधी आमदारांनी बहिष्कार घातला. २९ आमदार हजर राहिले. आमदारांच्या उपस्थितीचे प्रमाण ७२.५ टक्के होते.

विरोधकांचा बहिष्कार

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, आम्ही सर्व विरोधकांनी संयुक्तपणे बहिष्कार र घातलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकार लोकशाही प्रक्रिया पायदळी तुडवीत असल्यामुळे बहिष्कार घालत असल्याचे ते म्हणाले. युरी यांच्यासह काँग्रेसचे डिकॉस्टा आमदार एल्टन फॉरवर्ड' चे आमदार विजय विजय सरदेसाई, 'आरजी'चे आमदार वीरेश बोरकर, 'आप'चे आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा या सातही विरोधी आमदारांनी बिर्ला यांच्या भाषणावर बहिष्कार घातला.

 

Web Title: shortening duration of conventions a matter of concern says om birla and praises goa performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.