धक्कादायक ! गोव्यात 20 वर्षीय मुलीला जाळलं जिवंत
By Admin | Updated: May 12, 2017 18:36 IST2017-05-12T12:50:55+5:302017-05-12T18:36:46+5:30
पणजी येथे एका मुलीला जिवंत जाळून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक ! गोव्यात 20 वर्षीय मुलीला जाळलं जिवंत
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12 - एका मुलीला जिवंत जाळून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंदाजे अठरा ते वीस वर्षाच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. गुरुवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधितेची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. मुलगी अल्पवयीन असावी, असेही पोलिसांना प्रथमदर्शनी वाटते.
येथून पश्चिमेला सुमारे 20 ते 22 किलोमीटरवर शिवोली गाव आहे. या गावातील बामणवाडा येथे खुल्या मैदानावर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. भर लोकवस्तीत हे मैदान येते. मैदानावर मुलीला फरपटत नेल्याच्या खाणा-खुणा दिसतात. तसेच घटनास्थळी लाईटर सापडलेलं आहे. मुलीला जाळण्यासाठी कशाचा वापर केला ते लगेचच समजू शकले नाही, पोलीसही चक्रावलेत.
मात्र, घटनास्थळाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. घटनास्थळी फक्त दोन हात दिसत होते. हात, बांगड्या, अंगठी आदींवरून मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. अन्य शरीर ओळखूच येत नाही. पोलिसांच्या अंदाजानुसार मृतदेहाचा एक पाय कुत्र्यांनी नेऊन अन्यत्र टाकलेला आहे. पोलिसात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.
(फोटो - जयेश नाईक)