महापालिका बैठकीत गदारोळ
By Admin | Updated: October 20, 2015 02:23 IST2015-10-20T02:23:19+5:302015-10-20T02:23:28+5:30
पणजी : स्मार्ट सिटीसाठी साधनसुविधा महामंडळाचा सहभाग नकोच, अशी भूमिका घेत महापालिका बैठकीत विरोधकांनी कामकाज रोखले. याच महिन्यात १२ रोजी झालेल्या

महापालिका बैठकीत गदारोळ
पणजी : स्मार्ट सिटीसाठी साधनसुविधा महामंडळाचा सहभाग नकोच, अशी भूमिका घेत महापालिका बैठकीत विरोधकांनी कामकाज रोखले. याच महिन्यात १२ रोजी झालेल्या विशेष बैठकीचे इतिवृत्त आधी सादर करा, नंतरच अन्य विषयांवर बोला, असा हट्ट धरून १३ विरोधी नगरसेवकांनी पणजी मनपा बैठकीत सोमवारी गदारोळ केला. यामुळे नमते घेऊन महापौरांना बैठक उद्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलावी लागली.
स्मार्ट सिटीसाठी मनपातच तांत्रिक समिती हवी, अशी मागणी सोमवारच्या विशेष बैठकीत विरोधकांनी केली होती व त्यानुसार आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिकी विभाग स्थापन करण्याचा ठरावही घेण्यात आला होता; परंतु या बैठकीचे इतिवृत्त तयार केले नाही. सोमवारी सर्वसाधारण बैठकीत महापौरांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू केले तेव्हा आधी विशेष बैठकीचे इतिवृत्त द्या, असा हट्ट विरोधी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी धरला. महापौरांना कामकाज पुढे नेण्यास मज्जाव करण्यात आला.
या गदारोळात हस्तक्षेप करताना आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. जीएसआयडीसीचा सहभाग हा प्राथमिक स्तरावर असणार आहे. त्यानंतर हे काम केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खास यंत्रणेकडे जाईल व या यंत्रणेत मनपाला ५0 टक्के सहभाग मिळणार आहे. त्यामुळे मनपाच्या हातात काहीच राहणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नका, असे आयुक्त म्हणाले तेव्हा विरोधक आणखीनच खवळले. स्मार्ट सिटी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात कोणती कामे हाती घेणार हे आधी सांगा, अशी मागणी नगरसेवक यतिन पारेख यांनी केली. बायंगिणी कचरा प्रकल्प, सांतइनेज नाल्याची सफाई व सौंदर्यीकरण आणि पार्किंग व्यवस्था या तीन गोष्टी प्राधान्यक्रमाने झाल्या पाहिजेत, असे पारेख म्हणाले. (प्रतिनिधी)