लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिमगोत्सवामुळे गोव्यात आनंदाचे वातावरण तयार होते. कष्टकरी समाज या उत्सवात सहभागी व्हावा या हेतूने राज्यभरात शिमगोत्सवाचे आयोजन करत आहोत. यामुळे आपल्या पारंपरिक कलेचे जतन होत आहे. युवापिढीही मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत आहे. शिमगोत्सवात भाग घेणाऱ्या कलाकारांनीच खऱ्या अर्थाने आपल्या पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन केले आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
पर्यटन खाते व फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीच्यावतीने काल, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय शिमगोत्सवास सुरुवात झाली. ओस्सय... ओस्सय... म्हणत ढोल ताशाच्या निनादात संध्याकाळी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मिरवणुका पार पडल्या. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे, कृषिमंत्री रवी नाईक, पर्यटन मंत्री रोहन खवटे, नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक, पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिमगोत्सव मिरवणुकीत मोठ्या संख्येने कलाकारांची पथके सहभागी झालेली. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात ठेवला होता.
परंपरा टिकवण्यासाठी एकत्र या
मंत्री रवी नाईक म्हणाले, गोव्याच्या कला व संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी मुख्यमंत्री आपल्या परीने संपूर्ण सहकार्य करत आहेत. प्रत्येक धर्मातील लोकांना सामावून घेऊन संस्कृती व कला सादर करण्याचा हक्क दिला जातो.
शिमगा ही आपली गोव्यातील परंपरा अशीच टिकून राहावी यासाठी गोवा सरकारकडून पूर्ण आर्थिक मदत केली जात आहे. यापुढेही गोमंतकीयांनी गोव्यातील परंपरा टिकवण्यासाठी एकत्र यावे.
सहभागी पथके
रोमटामेळ १६ चित्ररथ ३२ लोकनृत्य १३
वेशभूषा
कनिष्ठ गट : ५५ कलाकार वरिष्ठ गट : ३२ कलाकार