जिल्हाधिका-यांपाठोपाठ एसजीपीडीएचीही सरदेसाईंच्या बांधकामाविरोधात नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:32 IST2019-12-11T19:32:23+5:302019-12-11T19:32:25+5:30
यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सरदेसाई यांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे.

जिल्हाधिका-यांपाठोपाठ एसजीपीडीएचीही सरदेसाईंच्या बांधकामाविरोधात नोटीस
मडगाव: माजी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या बांधकामावर बंदी आणण्याची नोटीस उपजिल्हाधिका-यांनी दिलेली असतानाच बुधवारी एसजीपीडीएनेही या बांधकामावर कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस विजय सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई यांच्या नावे जारी केली आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सरदेसाई यांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे.
एसजीपीडीएचे चेअरमन विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. या बांधकामासाठी अर्ज करताना सरदेसाई यांनी काही कागदपत्रे सादर केली नव्हती त्यामुळे ही नोटीस जारी केल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या मागच्या बैठकीत या बांधकामावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी सरदेसाई यांना नोटीस पाठविण्याबरोबरच या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात यापूर्वी प्रतिक्रिया देताना सरदेसाई यांनी राजकीय सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय, असे म्हटले होते.