सत्तरीत माकडतापाचा उद्रेक
By Admin | Updated: January 10, 2016 01:40 IST2016-01-10T01:40:18+5:302016-01-10T01:40:38+5:30
वाळपई : सत्तरी तालुक्यात माकडताप फोफावत असून शनिवारी म्हाऊस गावात आणखी दोन रुग्ण सापडले असून

सत्तरीत माकडतापाचा उद्रेक
वाळपई : सत्तरी तालुक्यात माकडताप फोफावत असून शनिवारी म्हाऊस गावात आणखी दोन रुग्ण सापडले असून त्यात एकाची स्थिती गंभीर असल्याने त्याला गोमेकॉ बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत दहा जणांना माकडताप झाल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हाऊस, कोपार्डे व झर्मे गावातील अनेकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अजून आलेला नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाली गावात माकडतापाने सर्वांनाच भयभीत करून सोडले होते. त्यानंतर म्हाऊस व आता झर्मे व कोपार्डे गावात माकडताप फोफावत आहे. माकडतापाविषयी आरोग्य खात्यातर्फे जागृती शिबिराचे आयोजन करूनसुद्धा माकडतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे.
जंगलात गेल्यामुळे माकडतापाचा प्रादुर्भाव होतो, असे जागृती शिबिरात सांगण्यात येत असले, तरी या वर्षी माकडतापाची लागण झालेले रुग्ण हे कामानिमित्त जंगलात जाणाऱ्यांपैकी नाहीत. त्यामुळे माकडतापाचे मूळ कारण लक्षात न आल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेऊन मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर माकडतापाविषयी संशोधन करत आहेत, तर आरोग्य केंद्राचे डॉक्टर जागृती व उपचारासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. (प्रतिनिधी)