ट्रकवाल्यांना दरवाढ देण्यास ‘सेसा’चा नकारच
By Admin | Updated: December 25, 2015 02:03 IST2015-12-25T02:02:40+5:302015-12-25T02:03:05+5:30
ट्रकवाल्यांना दरवाढ देण्यास ‘सेसा’चा नकारच

ट्रकवाल्यांना दरवाढ देण्यास ‘सेसा’चा नकारच
पणजी : सेसा गोवा कंपनी ट्रकांसाठी दरवाढ करून देण्यास तयार नाही. आपल्याला दरवाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारच नाही, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.
सेसा गोवा कंपनीची ट्रकांद्वारे खनिज वाहतूक ही ३३ किलोमीटरची असते. त्यामुळे आम्हाला दरवाढ देणे परवडत नाही. पण अन्य काही कंपन्या केवळ एक-दोन किलोमीटरचीच वाहतूक ट्रकांकडून करून घेतात. लोडिंग व अनलोडिंगवेळीच ट्रकांना खूप इंधन वापरावे लागते. त्यामुळे काही कंपन्या दरवाढ करून देत असतात; पण सेसा गोवाला ते शक्य नाही, असे सेसाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
दरम्यान, उत्तर गोव्यात सेसाची खनिज वाहतूक सध्या बंदच आहे. ट्रकमालकांनीही संप पुकारला आहे. गोवा खनिज निर्यातदार संघटनेची गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासोबत बैठक झाली. खनिज व्यवसाय नव्याने सुरू करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत संघटनेने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ट्रक वाहतुकीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)