महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सीमेवर कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:32 IST2019-10-15T13:31:49+5:302019-10-15T13:32:13+5:30
गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या प्रत्येक वाहनांची कडकपणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सीमेवर कडक बंदोबस्त
म्हापसा : पुढील आठवड्यात होणा-या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकी निमित्त गोव्यातून होणा-या गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस खात्याचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी या संबंधीची माहिती दिली.
पेडण्यात तसेच म्हापसा तालुक्याचे उपअधीक्षक प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याला लागून असलेल्या महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. पत्रादेवी, न्हयबाग तसेच केरी येथील चेकनाक्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतरही नियंत्रण कक्षाच्या वाहनांच्या गस्तीतही सीमावर्ती भागात वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली.
गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या प्रत्येक वाहनांची कडकपणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दारूची महाराष्ट्रात तस्करी होऊ नये यासाठी सुद्धा उपाय योजना हाती घेण्यात आली असून अबकारी खात्याच्या सहकार्याने वाहनांच्या तपासणीवर भर दिला जात असल्याची माहिती प्रभुदेसाई यांनी दिली. सुरक्षा व्यवस्थे संबंधी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांसमवेत संपर्कात असून गोव्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील मतदान शांततेत व्हावे यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान दिल्याची माहिती दिली.
सिंधुदुर्गातील अधीक्षकांकडून तेथील विविध गुन्ह्यांत वॉन्टेड असलेल्या सहा गुन्हेगारांची यादी गोवा पोलिसांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. यात पेडणे, म्हापसा, गोवा वेल्हा, मडगाव परिसरातील गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांकडून तेथील निवडणुकी दरम्यान अशांतता माजवण्याची शक्यता व्यक्त करून सदर यादी सुपूर्द करण्यात आली असून त्यांना त्याबाबतीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले असल्याचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई म्हणाले.