लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: यंदा शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असले तरी जुन्या वेळापत्रकात बदल न केल्यामुळे इयत्ता नववीपर्यंतचा निकाल हा २९ एप्रिल रोजीच लागणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यासाठी तयारी असली तरी यंदा चालू शैक्षणिक वर्ष मात्र नवीन शैक्षणिक वर्षात संपवावे लागणार आहे.
शैक्षणिक धोरणात घेण्यात आलेल्या क्रांतीकारी निर्णयानुसार नवे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे. तसे परिपत्रकही दोन आठवड्यांपूर्वी शिक्षण खात्याकडून जारी करण्यात आले होते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सबंधित घटकांशी संवाद साधून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांशी बैठकाही झाल्या आहेत. चालू वेळापत्रकानुसार इयत्ता नववीपर्यंतचे निकाल हे २९ एप्रिल रोजी जाहीर करावे लागणार असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
नवीन वर्षाची सुरूवात जरी निकाल जाहीर करण्यापूर्वी झाली तरी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना या संबंधी कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे संचालकांनी सांगितले. कारण इयतता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण आहे आणि इयत्ता नववीला कुणी नापस झाले तर त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची सवलत आहे.