सांकवाळ मरिना गोत्यात

By Admin | Updated: July 7, 2015 01:53 IST2015-07-07T01:53:23+5:302015-07-07T01:53:33+5:30

पणजी : सांकवाळ किनारी भाग जैव वारसा स्थळ जाहीर करण्यासाठी पुरेसे दाखले गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), जैव विविधता मंडळ, तसेच वन,

Sankawal marina dosta | सांकवाळ मरिना गोत्यात

सांकवाळ मरिना गोत्यात

पणजी : सांकवाळ किनारी भाग जैव वारसा स्थळ जाहीर करण्यासाठी पुरेसे दाखले गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), जैव विविधता मंडळ, तसेच वन, कृषी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या तपासणीत मिळाले असून यामुळे येथे येऊ घातलेला सुमारे १00 कोटींचा मरिना प्रकल्प गोत्यात आला आहे.
तपासणीसाठी गेलेल्या पथकातील सर्वच सदस्यांनी हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने बांधकामांना परवाने देऊ नये, अशी भूमिका घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा भाग जैव वारसा स्थळ म्हणून जाहीर झाल्यानंतर तेथे कोणतेही बांधकाम करता येणार नाही.
सांकवाळ व नावशी, बांबोळी मरिना प्रकल्पांना स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता त्यामुळे निर्णयाचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले होते. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. खासगी कंपनी आणि मुरगाव पोर्ट ट्रस्टने दोन मरिना सूचविल्या होत्या. त्यात एक सांकवाळ व दुसरा नावशी, बांबोळी येथे उभारण्याच्या हालचाली आहेत.
सांकवाळच्या स्थानिक आमदार तथा पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाना तसेच सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी मरिना प्रकल्पांना विरोध दर्शविला होता. मरिना आल्यास स्थानिक मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल, तसेच बोटी मोठ्या प्रमाणात येतील व त्यामुळे प्रदूषणही होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.
पर्यावरण मंत्रालय तसेच जैव विविधता मंडळाने परवानगी दिली तरच पुढे जावे या अटीवर गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सांकवाळ येथे याच्च हॅवन मरिना व नावशी येथे कार्गवाल मरिना येणार होता.
जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव नितीन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, सांकवाळ किनारपट्टीची सोमवारी सीआरझेड अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त तपासणी केल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला; परंतु मरिना प्रकल्पाशी या तपासणीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. या किनारी पट्ट्यात शिपयार्डकडून प्रदूषण होत असल्याचे तसेच तिसऱ्यो, शिनाण्यो व अन्य मत्स्यसंपत्ती धोक्यात आल्याची स्थानिकांची तक्रार होती.
त्यामुळे मुरगाव बंदरापासून कुठ्ठाळी पुलापर्यंत किनारी भागाची तपासणी
केल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sankawal marina dosta