राज्यात सर्व घरांसाठी २०१७ पर्यंत संडास
By Admin | Updated: December 19, 2014 03:44 IST2014-12-19T03:39:39+5:302014-12-19T03:44:17+5:30
मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘लोकमत’ कार्यालयात संवाद

राज्यात सर्व घरांसाठी २०१७ पर्यंत संडास
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पर्यंत देशातील सर्व घरांना संडास तथा स्वच्छतागृहे मिळायला हवीत, असे म्हटले आहे. गोव्यात ७४ टक्के घरांसाठी संडासाची सोय आहे. त्यामुळे २०१७ पर्यंत सर्व घरांसाठी या राज्यात संडासाची सोय उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.
गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ‘लोकमत’च्या पणजीतील कार्यालयात अतिथी संपादक म्हणून आले होते. या वेळी त्यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वच्छ भारताचे ध्येय समोर ठेवले आहे. प्रत्येक नागरिकाने या ध्येयपूर्तीसाठी सहकार्य करून जबाबदारी उचलायला हवी. गोव्यातील किती विद्यालयांसाठी संडासांची सोय नाही, याची माहिती मी शिक्षण खात्याकडून जाणून घेतली. संडासच नाही व असले तरी, ते दुरुस्त करायला हवेत, अशी सुमारे १९० विद्यालये असल्याचे आढळून आले. राज्यातील कॉर्पोरेट जगताच्या मदतीने या संडासांची सोय करावी, असे मी ठरविले व तसे पत्र उद्योजक जगतासाठी लिहिण्यास मी संचालकांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व सरकारी शाळांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभापूर्वी स्वच्छतागृहे तथा संडास मिळतील. कॉर्पोरेट जगत त्यासाठी निश्चितच मदत करील, असा मला विश्वास आहे. एका वृत्त वाहिनीवरून मी आवाहन करताच माझ्या मांद्रे मतदारसंघातील मोरजी येथील प्रमोद राणे या रेस्टॉरंट व्यावसायिकाने मला एसएमएस पाठवला. आपण ५० ते १०० स्वच्छतागृहांची व्यवस्था करू शकतो, असे त्याने
मला सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, एक लाख रुपयांत तीन संडास बांधता येतात. सर्व घरांना सरकार संडास देऊ शकते; पण नागरिकांनीही एकमेकांची जबाबदारी स्वीकारायला हवी. एखाद्या वाड्यावरील ९ पैकी ८ घरांना जर संडास आहे व नवव्या घराला नसेल तर त्या घराला संडास मिळावा म्हणून इतरांनी सहकार्य करायला हवे. एक भाऊ जर कुटुंबाच्या एकत्रित जमिनीत संडास बांधू इच्छितो, तर दुसरा भाऊ त्यास आक्षेप घेतो, अशी उदाहरणेही गोव्यात आहेत. गोव्यात अजूनपर्यंत अनेक घरांना जमिनींबाबतच्या वादांमुळेच संडास मिळालेले नाहीत. प्रत्येकास संडास बांधण्यासाठी जमीन काही सरकार देऊ शकत नाही. एखाद्या पंच सदस्याने जर आपण आपल्या प्रभागातील सर्व घरांना संडासाची सोय मिळवून देईन, असे ठरवून तसे जर करून दाखवले तर त्यास पुरस्कार देण्याचा विचारही सरकार करू शकते.
वाचनालयाची स्थिती
मुख्यमंत्री म्हणाले की, मी परवा साळ गावातील सरकारी हायस्कूलला भेट दिली. तेथील वाचनालयाची स्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. वाचनालय असो किंवा संडास असो, सगळे सुस्थितीत असायला हवे. सर्व शाळा, पंचायती, पालिका, हायस्कुलांनी आपल्या इमारतीसाठी योग्य संडास असतील याची जबाबदारी घ्यायला हवी.
विजय दर्डा यांच्याकडून
मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
‘लोकमत’ पत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना गोवा मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पार्सेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी विजय दर्डा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सरकारच्या विधायक कामात ‘लोकमत’ सदैव आपल्या पाठीशी राहील, असेही दर्डा यांनी या वेळी सांगितले. (खास प्रतिनिधी)