मिकींबद्दल अफवांना ऊत
By Admin | Updated: April 14, 2015 02:00 IST2015-04-14T02:00:03+5:302015-04-14T02:00:37+5:30
मडगाव : अटक वॉरंट जारी करून चार दिवस उलटले तरी माजी मंत्री मिकी पाशेको हे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. दरम्यान, गायब झालेल्या पाशेकोंसंदर्भात

मिकींबद्दल अफवांना ऊत
मडगाव : अटक वॉरंट जारी करून चार दिवस उलटले तरी माजी मंत्री मिकी पाशेको हे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. दरम्यान, गायब झालेल्या पाशेकोंसंदर्भात अफवांना ऊत आला आहे. पाशेको हे सोमवारी तामिळनाडूतील वालंकिणी चर्चमध्ये दिसले, अशा प्रकारची जोरदार अफवा संपूर्ण गोव्यात पसरली होती. पाशेको गोव्यात येण्यास ट्रेनने दाखल झाले असून मंगळवार, दि. १४ रोजी न्यायालयासमोर शरण येणार, अशा आणखी एका अफवेने सोमवारी सायंकाळपर्यंत जोर धरला होता.
याबाबत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांना विचारले असता, अजूनही आम्हाला कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे ते म्हणाले. पाशेको यांना शोधण्यासाठी दिल्लीला गेलेले पोलीस पथक तेथे पोहोचले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले; परंतु अजूनही पाशेकोंचा थांगपत्ता लागलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
वीज अभियंता मारहाण प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाल्याने मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी मागच्या गुरुवारी पाशेकोंच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. या वॉरंटची सात दिवसात कारवाई करावी, असा आदेश त्यांनी दिला होता. यानुसार पोलिसांना बुधवारपर्यंत पाशेको यांना न्यायालयासमोर हजर करायचे आहे. बुधवारपर्यंत ते सापडले नाहीत तर त्यांना फरार घोषित करण्यासाठी कोलवा पोलीस न्यायालयासमोर नव्याने अर्ज करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
(प्रतिनिधी)