मडगाव नगराध्यक्षासाठी इच्छुकांतच रस्सीखेच
By Admin | Updated: June 1, 2014 01:48 IST2014-06-01T01:41:19+5:302014-06-01T01:48:16+5:30
मडगाव : मडगावच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ३ जूनला होणार्या निवडणुकीसाठी तब्बल आठ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज नेले असले, तरी अंतिम लढत सदानंद नाईक,

मडगाव नगराध्यक्षासाठी इच्छुकांतच रस्सीखेच
मडगाव : मडगावच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ३ जूनला होणार्या निवडणुकीसाठी तब्बल आठ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज नेले असले, तरी अंतिम लढत सदानंद नाईक, गोंझाक रिबेलो व अविनाश शिरोडकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गटाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत गोंझाक रिबेलोंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असले, तरी शिरोडकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी गटातून या निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा, यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी भाई नायक यांच्या आके येथील निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीवेळी अविनाश शिरोडकर व गोंझाक रिबेलो या दोघांनीही आपली नगराध्यक्षाची इच्छा व्यक्त केली. दोघांमध्येही समझोता होऊ न शकल्यामुळे शेवटी लॉटरीद्वारे उमेदवार ठरवावा, असा पर्याय पुढे आला. मात्र, या पर्यायाला शिरोडकर यांनी आक्षेप घेतल्याचे या बैठकीला हजर असलेल्या एका नगरसेवकाने सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी गटाच्या या बैठकीला विरोधी गटातील लक्ष्मीकांत कामत हेही उपस्थित होते, तर आपल्या वैयक्तिक कामामुळे सत्ताधारी गटातील संगीता अवदी या बैठकीला हजर राहिल्या नाहीत. शेवटी उपस्थित नगरसेवकांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे ठरविण्यात आले. या वेळी रिबेलो यांना ८, तर शिरोडकर यांना २ मते मिळाली. या घडामोडीनंतर गोंझाक रिबेलो नगराध्यक्ष होतील असे मानले जात होते. मात्र, पूर्वीच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. आपण अजूनही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहोत, असे शिरोडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. उद्या, रविवारीही सत्ताधारी गटाची बैठक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विरोधी गटाकडून बहुतेक सदानंद नाईक यांनाच उमेदवार म्हणून पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या गटातून सुशीला नायक, बेर्था कार्दोज, दामोदर शिरोडकर व टिटो कार्दोज यांनीही उमेदवारी अर्ज नेले आहेत. या संदर्भात शिरोडकर यांना यात जिंकणार कोण, असे विचारले असता दि. ३ जून रोजीच ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. विरोधी गट एकसंध असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)