पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्यामंगळवारी २१ रोजी सकाळी ११.३0 वाजता जाहीर केला जाईल. २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३0 या वेळेत विद्यालयांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल.गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत म्हणाले की, निकालाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. पर्वरी येथे शिक्षण संचालनालयाच्या इमारतीत सकाळी ११.३0 वाजता निकाल जाहीर होईल आणि लगेच तो मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल. २८ केंद्रांवर १९,३४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष गरजा असलेल्या २८४ परीक्षार्थींनीही या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.मुरगाव तालुक्यातील विद्यालयांमधील परीक्षार्थींच्या गुणपत्रिका सेंट अॅण्ड्रयु स्कूलमध्ये तसेच काणकोण व सासष्टी तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका मडगाव येथील लॉयोला हायस्कूलमध्ये, केपे आणि सांगे तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका कुडचडे येथील एसईएस हायस्कूलमध्ये, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका फोंड्यातील ए. जे. डी आल्मेदा हायस्कूलमध्ये, तिसवाडीतील विद्यालयांच्या गुणपत्रिका प्रोग्रेस हायस्कूलमध्ये, बार्देस आणि पेडणे तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका म्हापशातील ज्ञानप्रसारक विद्यालयात तर डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील विद्यालयांच्या गुणपत्रिका साखळीच्या प्रोग्रेस हायस्कूलमध्ये वितरीत केल्या जातील.
गोव्यात दहावीचा निकाल उद्या, सकाळी 11.30 वाजता होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:40 IST