नववर्ष स्वागताला गोव्यातील रिसॉर्ट, रेस्टॉरंट सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2024 08:00 IST2024-12-31T07:59:39+5:302024-12-31T08:00:09+5:30
मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल परिसरातील हॉटेल्सच्या खोल्या, कॉटेजिस गजबजल्यात

नववर्ष स्वागताला गोव्यातील रिसॉर्ट, रेस्टॉरंट सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पर्यटनाचा आनंद लुटताना जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी किनारी भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट सज्ज झाली आहेत. तालुक्यातील मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी या भागांत नाताळ उत्सवादरम्यानच हॉटेल्सच्या खोल्या, कॉटेजिस फुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
किनारी भागातील हॉटेस्स, रिसॉर्ट, क्लबनी संगीत रजनी पार्थ्यांचेही आयोजन केले आहे. खरे म्हणजे मांद्रे मतदारसंघातील मोरजी आश्वी मांद्रे हे दोन किनारी संवेदनशील जाहीर केले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आतापर्यंत झालेली नाही. नववर्षासाठी येणारे पर्यटक पहाटेपर्यंत संगीत रजनीमध्ये सामील असतात. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांनाही ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करावा लागतो.
सध्या किनारी भागातील बीच रिसॉर्ट सजलेली दिसतात. नेहमी वर्ष अखेरीचा सूर्यास्त ते नववर्षाच्या सूर्योदयापर्यंत संगीत रजनी पार्थ्यांची धूम असते. अनेक क्लबनी आंतरराष्ट्रीय किर्तीचे डीजे पार्थ्यांमध्ये सहभागासाठी लाखो रुपये देऊन आणले आहेत. या पार्थ्यांसाठी पाचशे ते सात हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारले जात आहे. पार्थ्यांमधून दोन ते तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होते. मोरजी येथील व्यावसायिक संदेश शेट गावकर यांनी सांगितले की, सरकारकडून संगीत वाजविण्यास नियमानुसार परवाने दिले जातात. त्यांचे व्यवस्थित पालन होते की नाही? याची काटकोर पाहणी करायला हवी.
यासंदर्भात पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, आगामी काही महिन्यांमध्ये पर्यटकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी पुरवल्या जातील. शिवाय मोरजी किनारी भागात चेंजिंग रूम, पार्किंगची व्यवस्था केली जाईल.
दरम्यान, मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल आणि केरी तेरेखोल या किनारी भागात एकही तारांकित सोयी सुविधा असलेले हॉटेल नाही. शिवाय सुरक्षा व्यवस्थेचेही तीन-तेरा वाजलेले असतात. रस्त्यावरील कचरा, वारंवार होणारे ध्वनी प्रदूषण याचा त्रास पर्यटकांना होतो. जास्त पैसा खर्च करून आल्यानंतर जर चांगले पर्यावरण आणि सोयी सुविधा नसतील, तर उच्च दर्जाचे पर्यटक येणारच का? असा प्रश्न निर्माण होत आहे.