दिलीप परुळेकरांवर गुन्हा नोंद करा!
By Admin | Updated: October 16, 2015 02:58 IST2015-10-16T02:57:53+5:302015-10-16T02:58:10+5:30
म्हापसा : कथित घोटाळा करून सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर

दिलीप परुळेकरांवर गुन्हा नोंद करा!
म्हापसा : कथित घोटाळा करून सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू व कोमुनिदादच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पर्वरी पोलिसांना गुरुवारी ( १५ आॅक्टोबर) दिले. पोलिसांत केलेली तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती.
या प्रकरणात दिलीप परुळेकर यांच्यावर डिमेलो यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ती नोंद केली नव्हती, परिणामी ट्रोजन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परुळेकर यांनी कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा करून सर्व्हे क्रमांक ३७६/६, ३७९/१, ३८९/१, ३७९ मधील जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप डिमेलो यांनी तक्रारीत केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू प्रमोद दाभोळकर ऊर्फ परुळेकर, कोमुनिदादचे अॅटर्नी पीटर मार्टिन्स, इर्मिन सिक्वेरा तसेच कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम ११९, १२०, ४१८ अन्वये तसेच अन्य कलमांन्वये नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्वांनी कटकारस्थान रचून कोमुनिदादची महत्त्वाची जागा परुळेकर यांना दिल्याचे म्हटले आहे. सेरुला कोमुनिदादचा हा भाग सुकूर पंचायत क्षेत्रात येतो. २०१४ मध्ये विविध सर्व्हेतील जागा दिलीप परुळेकर यांच्या नावावर झाली होती. संबंधित जागा विकत घेण्यासाठी परुळेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या जागेत परुळेकर यांचा सुमारे २० चौरस मीटर जागेत छोटासा गाडा होता. आता विकत घेतलेली जमीन सुमारे ५९९ चौरस मीटर आहे. सध्या संबंधित जागेत मोठे दुकान थाटले आहे. सेरुला कोमुनिदाद जमीन विक्रीप्रकरणी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गुन्हा अन्वेषण विभागातर्फे चौकशी सुरू आहे.
२० आॅक्टोबर २०१४ रोजी ट्रोजन यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने ट्रोजन अखेर जानेवारी २०१५ मध्ये न्यायालयात
गेले.
(खास प्रतिनिधी)