पाकला चोख प्रत्युत्तर देऊ
By Admin | Updated: December 8, 2014 02:00 IST2014-12-08T01:56:34+5:302014-12-08T02:00:29+5:30
संरक्षणमंत्र्यांचा इशारा : काश्मीरमधील हल्ला पाक पुरस्कृतच

पाकला चोख प्रत्युत्तर देऊ
पणजी : काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता हे सिद्ध झाले आहे. या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे दिला.
पर्रीकर हे गोव्यात सुरू असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी जुने गोवा येथे गेले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीरमध्ये लष्करी छावणीवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांकडे सापडलेली शस्त्रास्त्रे ही पाकिस्तान बनावटीची होती. त्यामुळे हल्लेखोर पाकिस्तानी होते, हे सिद्ध झाले. ही घटना सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. या हल्ल्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानला मिळेल. काय केले जाईल याबद्दल आम्ही बोलणार नाही; परंतु जे काही करायचे ते केले जाईल, असे ते म्हणाले. काश्मीरमधील हिंसक घटनांनंतर देशाचे लष्कर प्रमुख तीन वेळा काश्मीरमध्ये जाऊन आले. यावरून सततचे हल्ले किती गांभीर्याने घेतले जातात आणि त्याबद्दल आमचे इरादेही स्पष्ट आहेत, असेही ते म्हणाले.
काश्मीरमधील निवडणुकांनंतर अतिरेकी हल्ले वाढले आहेत याचे कारण सांगताना ते म्हणाले, निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसादामुळे काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात असल्याचे सत्य पुन्हा एकदा जगासमोर आले. ७२ टक्के मतदान नोंद झाल्यामुळे काश्मीरमधील लोक मोठ्या प्रमाणावर लोकशाही प्रक्रियेत सहभागी होतात याची दखल जागतिक पातळीवर घेतलीआणि हेच नेमके पाकला झोंबले. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन हल्ले
चालविले आहेत. (प्रतिनिधी)