...तर बंड मोडून काढले असते!
By Admin | Updated: October 7, 2015 01:40 IST2015-10-07T01:39:56+5:302015-10-07T01:40:08+5:30
पणजी : गेल्या रविवारपासून खातेबदलाच्या विषयावरून मंत्र्यांमध्ये मोठी धुसफूस झाली. दयानंद मांद्रेकर यांनी तर आक्रमक भूमिका घेतली.

...तर बंड मोडून काढले असते!
पणजी : गेल्या रविवारपासून खातेबदलाच्या विषयावरून मंत्र्यांमध्ये मोठी धुसफूस झाली. दयानंद मांद्रेकर यांनी तर आक्रमक भूमिका घेतली. मंत्रिमंडळात बंड होते की काय, अशी स्थिती तयार झाली होती. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे ठाम राहिले. एखाद्या मंत्र्याने संतापाने राजीनामा दिला असता, तर लगेच अन्य एखाद्या आमदाराचा शपथविधी करून बंड मोडून काढण्याची तयारी भाजपने ठेवली होती, अशी माहिती मिळाली आहे.
मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पार्सेकर यांनी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली नाही; कारण त्यांच्याशी चर्चा केली असती, तर कदाचित खातेबदल शक्यच झाले नसते. पार्सेकर यांनी पर्रीकर यांच्याशी व भाजपच्या कोअर टीमशी चर्चा केली होती. कुणाचे कोणते खाते काढले जाईल व कुणाला कोणते खाते दिले जाईल, हे भाजपच्या कोअर टीमला ठाऊक होते. रविवारी खातेवाटप केल्यानंतर बंडाची ठिणगी पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सोमवारी पर्रीकर यांची भेट घेतली व आपण स्थिती हाताळतो, अशी ग्वाही त्यांना दिली. एखाद्या मंत्र्याने जर निषेधार्थ राजीनामा दिलाच तर काय करावे, याविषयीही पार्सेकर व पर्रीकर यांच्यात चर्चा झाली. मंत्रिमंडळातील जागा एखाद्या नव्या आमदाराच्या सहभागाने लगेच भरून होऊ घातलेल्या बंडातील हवा काढून घ्यावी, असे उच्च स्तरावर ठरले होते. केवळ भाजपच नव्हे, तर काही बिगर भाजप आमदारही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत व त्यांनाही मंत्रिपद मिळविण्याची घाई असल्याने ते देखील मंत्रिमंडळात सहभागी झाले असते, अशी माहिती मिळाली.
(खास प्रतिनिधी)