ख्रिस्ती आमदारांचे बंड अखेर थंडावले
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:15+5:302015-06-14T01:54:15+5:30
पणजी : सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सर्व ख्रिस्ती आमदारांचे संघटन करून त्या दबावाद्वारे शैक्षणिक मागण्या पदरात पाडून घेण्याचा डायोसेझन संस्थेचा

ख्रिस्ती आमदारांचे बंड अखेर थंडावले
पणजी : सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सर्व ख्रिस्ती आमदारांचे संघटन करून त्या दबावाद्वारे शैक्षणिक मागण्या पदरात पाडून घेण्याचा डायोसेझन संस्थेचा प्रयत्न प्रथमच फसला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार ठाम राहिल्याने बंडाच्या भूमिकेतील ख्रिस्ती मंत्री, आमदारही आता पूर्णपणे बॅकफुटवर आले आहेत.
शिक्षण खाते ज्या इंग्रजी शाळांचे व हायर सेकंडरींचे प्रस्ताव मान्य करत नाही, ते मान्य करून घेण्यासाठी चर्च संस्थेच्या डायोसेझन शिक्षण मंडळाने जो मार्ग पत्करला, त्याला धार्मिक स्वरूप मिळाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. ते ठाम राहिले व उतावीळ बनलेल्या आपल्या ख्रिस्ती आमदारांनाही त्यांनी योग्य ती समज दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा दुसऱ्यांदा डायोसेझनने बैठक बोलावली, तर भाजपचे आमदार त्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, अशी माहिती मिळाली. एलिना साल्ढाणा व आवेर्तान फुर्तादो हे दोघे मंत्री असल्याने त्यांनी तरी डायोसेझनच्या अजेंड्याचा भाग व्हायला नको होते, अशी भावना हिंदू मंत्री व आमदारांत व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी नव्या शाळांना मान्यता देण्याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. जिथे शाळा किंवा हायर सेकंडरीची खरोखरच गरज आहे व कुणीही आक्षेप घेत नसेल, तिथेच मान्यता द्यावी, या भूमिकेशी पार्सेकर ठाम असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून शनिवारी मिळाली.
(खास प्रतिनिधी)