राज्यातील रिअल इस्टेट गडगडली

By Admin | Updated: January 31, 2015 02:32 IST2015-01-31T02:11:20+5:302015-01-31T02:32:56+5:30

१५०० फ्लॅट ग्राहकांविना : पण किमतीही खाली उतरेनात

The real estate in the state collapses | राज्यातील रिअल इस्टेट गडगडली

राज्यातील रिअल इस्टेट गडगडली

सुशांत कुंकळयेकर-मडगाव : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेला खाण उद्योग व पर्यटन उद्योग डळमळू लागला असतानाच रिअल इस्टेट या तिसऱ्या क्रमाकांच्या उद्योगालाही उतरती कळा लागली आहे. जागतिक मंदी आणि प्रशासकीय अनास्था यामुळे राज्यात या व्यवसायाची अवस्था ‘बिकट’
झाली आहे.
समुद्र व इतर नैसर्गिक सौंदर्यामुळे राज्यात रिअल इस्टेट व्यवसायाला काही वर्षांपूर्वी ‘बुम’ आले होते. यामुळे गेरा, डीएचएल यासारखे भारतातील बडे उद्योग गोव्यात उतरले होते. अनेक भारतीय गोव्यातील बांधकामांना गुंतवणुकीच्या नजरेतून पाहात असल्यामुळे गोवा हे ‘सेकंड होम डेस्टिनेशन’ बनले होते. मात्र, मागच्या दोन वर्षांत हे चित्र पालटले आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. देश प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या बांधकाम व्यवसाय मागणी कमी व पुरवठा जास्त अशा कात्रीत सापडला आहे. यातच स्थानिक कर, जमीन भाव व बांधकाम सामग्रीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने बिल्डर खऱ्या अर्थाने अडचणीत आले आहेत. शेकडो फ्लॅट बांधून तयार आहेत. मात्र, त्या किमती लोकांना परवडण्यासारख्या नसल्याने त्यांना मागणी नाही. अशा परिस्थितीत यापूर्वीच बांधकामावर पैसे खर्च केलेला बिल्डर फ्लॅटची किंमतही कमी करू शकत नाही. अशा विचित्र अवस्थेत गोव्याचा बांधकाम व्यवसाय आहे, असे ते म्हणाले.
गोव्याची आर्थिक राजधानी मानल्या गेलेल्या मडगावात किमान पाचशेच्या आसपास तयार फ्लॅट्स पडून आहेत. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत ही संख्या ३००च्या आसपास आहे. संपूर्ण गोव्याची स्थिती पाहिल्यास किमान दीड हजार तरी फ्लॅट्स अजूनही विकले गेलेले नाहीत.
गोव्यात बांधकाम व्यवसायाला मंदी आलेली असली तरी फ्लॅटचे गगनाला भिडलेले भाव मात्र तसेच आहेत. पणजीत ‘२ बीएचके’ फ्लॅटची किंमत ८० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे, तर मडगावात हीच किंमत ५० लाखांच्या आसपास आहे. या किमती सर्वसाधारण गोमंतकीयांना परवडणाऱ्या नाहीत, अशी कबुली मडगावातील नामांकित बिल्डर व सीटीस्केप या कंपनीचे प्रवर्तक दीप कारापूरकर यांनी दिली.
अन्य एका बहुराष्ट्रीय कंपनीशी संलग्न असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गोव्याचे रिअल इस्टेट मार्केट सध्या केवळ मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे तसेच अन्य भागातील गिऱ्हाईकांवर अवलंबून आहे, असे सांगितले. मुंबई, दिल्लीचे व्यावसायिक सध्या गोव्यात फ्लॅट विकत घेऊन त्यांचे सर्व्हीस अपार्टमेंटमध्ये रूपांतर करून दरमहा ७० ते ८० हजारांच्या भाड्याने देत असल्यामुळे केवळ हेच व्यावसायिक गोव्यात गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी करू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The real estate in the state collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.