राणे पिता-पुत्र जामिनावर
By Admin | Updated: July 26, 2014 01:20 IST2014-07-26T01:19:40+5:302014-07-26T01:20:57+5:30
बार्देस : खाणीच्या पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी घेतल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, त्यांचे पुत्र आमदार विश्वजित राणे

राणे पिता-पुत्र जामिनावर
बार्देस : खाणीच्या पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी घेतल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, त्यांचे पुत्र आमदार विश्वजित राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आता शुक्रवार, १ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वा. सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या म्हापसा न्यायालयात दाखल या अटकपूर्व जामीन अर्जावर आज २५ रोजी सुनावणी होणार होती.
राणे पिता-पुत्रांविरोधात राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) भ्रष्टाचार, खंडणी व कटकारस्थान या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गेल्या ५ जुलै रोजी राणे पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत राणे पिता-पुत्रांना अटक करू नये, तसेच त्यांनी गोवा सोडून जाऊनये, असे अंतरिम आदेशात म्हटले होते. या प्रकरणी ८ रोजी दुपारी २.३० वा. सुनावणी निश्चित केली होती. ८ रोजी एसआयटीचे वकील प्रसाद कीर्तनी यांनी राणेंच्या जामीन अर्जावर उत्तरासाठी वेळ मागितला. न्यायालयाने ही मागणी मान्य करून २१ जुलै रोजी दुपारी २.३० वा. सुनावणी निश्चित केली होती. न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली असता, राणे पिता-पुत्रांचे वकील शिरीष गुप्ते यांनी अटकपूर्व जामिनाच्या आधारासाठी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर केली. यामुळे या प्रकरणी युक्तिवाद होऊ शकला नाही. अतिरिक्त कागदपत्रांच्या अभ्यासासाठी वकील कीर्तनी यांनी वेळ मागितल्यावर सुनावणी पुढे ढकलली. त्या जामीन अर्जावर २५ रोजी युक्तिवाद झाला. त्या वेळी राणे पिता-पुत्रांतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. नंतर सरकारतर्फे वकिलांनी युक्तिवादासाठी येत्या १ आॅगस्टपर्यंत दुपारी २.३० पर्यंत वेळ मागून घेतला. आता त्या दिवशी सुनावणी होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)