लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपमध्ये मिक्स भाजी व खतखतें झालेय, हे सभापती रमेश तवडकर यांनी केलेले विधान आता लागू होत नाही. ते पूर्वीच्या गोष्टी बोलत असावेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
सभापती तवडकर यांच्या विधानाबद्दल विचारले असता दामू नाईक म्हणाले की, मधल्या काळात काही गोष्टी वर खाली झाल्या असतीलही. परंतु आता तसे काही नाही. उलट कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. जुने कार्यकर्ते मला भेटतात. माझ्याशी संपर्क साधतात. मी लोकांमध्ये जायला मिळावे म्हणून अधिकाधिक कार्यक्रम घेत असतो. मी घरी अभावानेच असतो. जास्त वेळ फिरण्यातच जातो. मात्र, कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्या मनात नवे-जुने असे काहीच दिसून येत नाही. पक्षासाठी मोठ्या उत्साहाने एकत्रपणे काम करताना दिसतात, असेही प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
दामू पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये गेल्यानंतर जवळीक वाढते. नवीन लोकांना पक्षाकडे कसे आकर्षित करता येईल याला माझे प्राधान्य आहे. कधीकाळी आम्ही कुठेतरी चुकलोही असू किंवा कमी पडलो असू, परंतु आता तसे काही नाही. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे व जुन्या कार्यकर्त्यांना मी भेटतच आहे." मंत्रिमंडळ फेररचनेबाबत दामू नाईक म्हणाले की, तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. पक्षाचे स्थानिक नेते, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय नेते एकत्र येऊनच काय तो निर्णय होणार आहे. तूर्त बदलाच्या हालचाली वगैरे असे काहीही नसल्याचेही ते म्हणाले.