बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: March 12, 2016 02:37 IST2016-03-12T02:37:17+5:302016-03-12T02:37:55+5:30

पणजी : बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांनी शुक्रवारी गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन

Quiz question on HSC examination | बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह

पणजी : बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांनी शुक्रवारी गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन जुझे रिबेलो यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. अर्धवेळ काम करणाऱ्या या शिक्षकांची आपल्याला सेवेत कायम करावे, अशी मागणी आहे.
रिबेलो यांच्याशी संपर्क साधला असता, या शिक्षकांनी असहकाराची नोटीस दिल्याचे त्यांनी मान्य केले. या प्रकरणी शिक्षण खात्याला पत्र लिहून कळविणार असून पेपर तपासणीसाठी पर्यायी व्यवस्थाही करणार असल्याचे रिबेलो यांनी सांगितले. उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये व्यावसायिक (व्होकेशन) शाखेत गेली अनेक वर्षे विद्यादान करणारे हे शिक्षक अर्धवेळ सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना इतर शिक्षकांइतका पगार किंवा अन्य सवलती मिळत नाहीत. सेवेत कायम केले जावे, अशी त्यांची मागणी असल्याचे रिबेलो म्हणाले.
पेपर तपासणीसाठी दिल्या जाणाऱ्या अल्प मानधनाचा विषयही मध्यंतरी ऐरणीवर होता. त्याबद्दल विचारले असता, रिबेलो म्हणाले की, कुशल शिक्षकांना या कामासाठी मानधन वाढविण्यात मोठीशी अडचण नाही; परंतु त्यांना सेवेत कायम करणे हा विषय बोर्डाच्या अखत्यारित येत नाही. त्याबाबत शिक्षण खात्याने म्हणजे सरकारनेच निर्णय घ्यायला हवा.
दरम्यान, गेल्या आॅक्टोबरच्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या डिजिटलाइज्ड मूल्यांकनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मार्च-एप्रिलमधील परीक्षांच्या निम्म्या उत्तरपत्रिकाही याच पद्धतीने तपासण्याचा विचार आहे, असे रिबेलो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Quiz question on HSC examination