हा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला!

By Admin | Updated: May 25, 2014 01:06 IST2014-05-25T01:05:47+5:302014-05-25T01:06:55+5:30

हा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला!

Put this on personal freedom! | हा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला!

हा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला!

 पणजी : नरेंद्र मोदींसंदर्भात फेसबुकवर शेरेबाजी करणार्‍या देऊ चोडणकर याला अटक करण्याचा प्रयत्न करून सरकार व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालू पाहत आहे, असा आरोप काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी येथे झालेल्या आंदोलनावेळी केला. येथील पोलीस मुख्यालयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चा नेऊन सरकारविरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, अपक्ष आमदार विजय सरदेसाई, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ समीर केळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक वाल्मीकी नायक व अनेक पदाधिकारी, वास्तुरचनाकार डिन डिक्रुझ, काँग्रेसचे कार्यकर्ते दुर्गादास कामत, विजय भिके अशा अनेकांनी या मोर्चात भाग घेतला. चिंबल येथील नागरिक असलेल्या व सध्या मुंबईत जहाजोद्योग अभियंता म्हणून काम करणार्‍या देऊ चोडणकर या व्यक्तीने गेल्या २३ मार्च रोजी फेसबुकवरून नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध शेरेबाजी केली होती. ती शेरेबाजी धार्मिक तणाव निर्माण करणारी आहे, अशी तक्रार अतुल पै काणे या उद्योजकाने पोलिसांत केल्यानंतर पोलिसांच्या सायबर विभागाने एफआयआर नोंद केला व आता चोडणकर यास अटक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. चोडणकर याने नंतर आपल्या शब्दप्रयोगांबाबत माफीही मागितली होती. तथापि, त्यास अटक करण्याचा प्रयत्न करून सरकार विरोधी मत चिरडून टाकू पाहत आहे, असा आक्षेप घेत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले. सुरुवातीला येथील आझाद मैदानावर सरकारविरुद्घ घोषणा देण्यात आल्या. चोडणकर ही व्यक्ती कुणी गुन्हेगार नव्हे. एका सामान्य व्यक्तीने स्वत:च्या मनातील भीती व्यक्त केली म्हणून त्यास अटक करणे हे निषेधार्ह आहे, असे समीर केळेकर म्हणाले. राज्य सरकार हुकूमशाही बनले असल्याचा आरोप या वेळी वक्त्यांनी करत सरकारविरुद्ध निदर्शने केली. नंतर जमावाचा मोर्चा पोलीस मुख्यालयासमोर गेला. तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविण्यात आला. येत्या सोमवारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन या प्रश्नी चर्चा करणार आहेत. चोडणकर प्रकरण सरकारला पचले, तर सरकार यापुढे सर्वांचीच गळचेपी करील, असे मत जॉन फर्नांडिस, रेजिनाल्ड, सरदेसाई आदींनी व्यक्त केले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Put this on personal freedom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.