पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार
By समीर नाईक | Updated: January 2, 2024 16:37 IST2024-01-02T16:36:32+5:302024-01-02T16:37:10+5:30
पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली.

पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार
पणजी: गेल्या वर्षीचा पर्पल फेस्ट हा एक साक्षात्कार होता. या उपक्रमाची चर्चा केवळ राज्यातच नाही, तर देशभरात पसरली होती. यंदा देखील या फेस्टचा योग्य वापर करत, स्वयंपूर्ण मित्रांच्या सहाय्याने दिव्यांगाविषयी असणाऱ्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाज आणि उत्तर गोव्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी कुमारी या मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वयंपूर्ण मित्रांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. समाजामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दिव्यंगत्व ओळख पत्र (युडीआयडी कार्ड) मिळवून देण्यात मदत करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले आहे. दिव्यांगजनांना सक्षम करण्याबाबत सरकारचे खास धोरण आहे आणि या धोरणाच्या अनुषंगाने सदर कार्डच्या माध्यमातून दिव्यांगजनांना आवश्यक साधनांची उपलब्ध करण्यास सुलभ बनते. पर्पल फेस्ट हा स्वयंपूर्ण मित्रांसाठी चांगले व्यासपीठ ठरणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
विविध सरकारी योजनांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, तसेच शासनाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधा यांची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्यांचे कौतुक आणि क्षमतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात क्रांतिकारी पाऊल टाकणारी चळवळ म्हणून पर्पल फेस्टचे महत्त्व असल्याचे सांगितले.
दि. ८ ते १३ जानेवारी या कालावधीत होणार्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट–गोवा विषयी स्वयंपूर्ण मित्रांना माहिती देण्यासाठी पर्वरी येथील लेखा विभागामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दिव्यांगजांना क्षमता व कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा बद्दल स्वयंपूर्ण मित्रांना माहिती देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी बैठकीच्या प्रारंभी या बहुप्रतिक्षित उपक्रमामध्ये आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रम यांची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केली.