पीटीएनेच उतरविले पालकांना रस्त्यावर
By Admin | Updated: August 3, 2015 01:58 IST2015-08-03T01:58:05+5:302015-08-03T01:58:21+5:30
पणजी : राज्यभर ३१ जुलै रोजी झालेल्या रस्ता रोको प्रकरणात फोर्स संघटनेकडून पालकांना रस्त्यावर येण्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या (पीटीए

पीटीएनेच उतरविले पालकांना रस्त्यावर
पणजी : राज्यभर ३१ जुलै रोजी झालेल्या रस्ता रोको प्रकरणात फोर्स संघटनेकडून पालकांना रस्त्यावर येण्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या (पीटीए) माध्यमातून भाग पाडण्यात आले होते. पालक-शिक्षक संघांकडून पालकांना आवाहन करणारी पत्रेही पाठविली होती.
३१ जुलै रोजी राज्यात १७ ठिकाणी झालेला रास्ता रोको हे सुनियोजित कारस्थान होते आणि त्यासाठी पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून पालकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले होते. ‘३१ जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत रास्ता रोको करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. माध्यमप्रश्नी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठीचा भाग असलेल्या रास्ता रोकोत सर्व पालकांनी सहभाग घ्यावा’ असे त्यात म्हटले होते. कुंकळ्ळी येथील अवर लेडी आॅफ हेल्थ हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाने या प्रकरणात पालकांना पाठविलेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. त्यात पालकांना चिंचोणे येथील सेंट सेबेस्त्यान कपेलजवळ जमण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे ३१ रोजी नमूद केलेल्या ठिकाणी पालकांनी येऊन रास्ता रोको केले होते.
अशीच पत्रे डायोसेझन सोसायटीच्या व अन्य काही विद्यालयांच्या पालक-शिक्षक संघांकडून पालकांना गेली होती. सर्वच ठिकाणी रास्ता रोको यशस्वी होऊ शकले नाही; परंतु एकूण १७ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले होते. बऱ्याच ठिकाणी एक पेक्षा अधिक विद्यालयांच्या पालकांना जमण्याची सूचना केली होती. त्यामुळे मोठी संख्या जमली होती. माध्यमाचा प्रश्न हा केवळ प्राथमिक विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित असला तरी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांतील पालकांनाही रस्त्यावर येण्यास भाग पाडले होते. काही ठिकाणी माध्यमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघांकडूनच आवाहनाची पत्रे पाठविली होती. (प्रतिनिधी)