लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कलम ३९ (ए) विरोधात २३ फेब्रुवारी रोजी काढलेल्या महामोर्चावेळी नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी निवासस्थानावर धडक मोर्चा नेल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विरोधी पक्षांचे आमदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे दीड हजार जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
या आंदोलनप्रकरणी एफआयआर नोंद झाल्याने संबंधितांना नोटिसा पाठवून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २३ फेब्रुवारी रोजी युरी आलेमाव यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी दोनापावला येथील नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानावर धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. कलम ३९ (अ) रद्द करावे, अशी त्यांची मागणी होती. या मोर्चात दोन हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.
मंत्र्यांच्या घरावरील मोर्चा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस आऊटपोस्ट येथे बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र राजकीय नेत्यांची पोलिसांनी अद्याप चौकशी केलेली नाही. यावरून ही निव्वळ सतावणूक असल्याचा आरोप अॅड. अमित पालेकर यांनी केला आहे.
कलम ३९ (अ) विरोधात दोनापावला येथे झालेल्या आंदोलनामुळे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातूनच या आंदोलनात सहभागी झालेल्यांविरोधात गुन्हे नोंद करून चौकशीसाठी बोलावले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमच्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही आणि कलम ३९ (ए) विरोधात तीव्रपणे लढा देऊ, असा इशारा फ्रान्सिस कुएल्हो यांनी दिला आहे.
आंदोलकांची चौकशी
कलम ३९ (अ) विरोधात झालेल्या आंदोलनावेळी नगरनियोजन खात्याच्या कार्यालयातून फाईल्स गायब केल्याचा आरोप ठेवत पणजी पोलिसांनी यापूर्वी आमदार वीरेश बोरकर, आरजी पक्षाचे कार्यकर्ते तसेच पाळे-शिरदोण येथील काही ग्रामस्थांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यापैकी काहींना पोलिसांनी नोटिसा बजावून शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. दोनापावला येथील पोलिस आऊटपोस्टमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेले योगेश गोवेकर ऊर्फ मोगॅम्बो, गजानन तिळवे, फ्रान्सिस कोएलो, संदेश तेलेकर यांची शनिवारी सकाळी पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अॅड. अमित पालेकर उपस्थित होते.
एफआयआरमध्ये काय ?
दोनापावला येथील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणे.आंदोलकांकडून आठ तास रस्ता अडवणे.सामान्य नागरिकांची गैरसोय करणे.वाहतुकीस अडथळा निर्माण करणे.
अशी आहेत नावे...
विरोधी आमदारांमध्ये युरींसह काँग्रेसचे आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, आपचे आमदार वेंझी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, आरजीचे नेते मनोज परब, अजय खोलकर, आपचे नेते वाल्मिकी नायक, सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर, रामा काणकोणकर, सिसिल रॉड्रिग्स यांच्यासह या मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या प्रकरणात यापूर्वीच वीरेश यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Goa police filed a case against opposition leaders and 1500 others for protesting at Minister Vishwajit Rane's residence regarding town planning. The FIR has sparked controversy, with allegations of harassment and threats. Protesters vow to continue fighting against the contentious law.
Web Summary : गोवा पुलिस ने मंत्री विश्वजीत राणे के आवास पर विरोध प्रदर्शन करने पर विपक्षी नेताओं और 1500 अन्य के खिलाफ मामला दर्ज किया। प्राथमिकी से विवाद उत्पन्न हो गया है, उत्पीड़न और धमकी के आरोप लग रहे हैं। प्रदर्शनकारियों ने विवादास्पद कानून के खिलाफ लड़ाई जारी रखने की कसम खाई।