पर्रीकरांकडे प्रचारसूत्रे, पार्सेकरांकडे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 02:01 IST2016-05-29T02:01:49+5:302016-05-29T02:01:49+5:30
पणजी : गोवा विधानसभेच्या येत्या निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचाराची सूत्रे मनोहर पर्रीकर यांच्याकडे राहतील व लक्ष्मीकांत पार्सेकर

पर्रीकरांकडे प्रचारसूत्रे, पार्सेकरांकडे नेतृत्व
पणजी : गोवा विधानसभेच्या येत्या निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचाराची सूत्रे मनोहर पर्रीकर यांच्याकडे राहतील व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जातील, असे भाजपच्या सर्व स्तरांवर आता निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली. भाजपच्या काही आमदारांनाही पक्ष नेतृत्वाकडून याची कल्पना देण्यात आली आहे.
पर्रीकर विधानसभा निवडणुकीवेळी गोव्याच्या राजकारणात परततील, या चर्चेचा अध्याय आता पक्षाने बंद केला आहे. निवडणुका पार्सेकर यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. भावी मुख्यमंत्री म्हणूनही पक्षाकडून सध्याचेच मुख्यमंत्री पार्सेकर यांना जनतेसमोर ठेवले जाईल. प्रचाराची धुरा तेवढी पर्रीकर सांभाळतील, असे उत्तर गोव्यातील पक्षाच्या एका जबाबदार आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले. या आमदाराने नुकतीच दिल्लीत पर्रीकर यांची भेट घेतली, त्या वेळी पर्रीकर यांनीही आमदारास तसेच सांगितले व निवडणुकीच्या तयारीस लागण्याचा सल्ला दिला.
दाबोळी मतदारसंघावर म. गो. पक्षाने दावा केला, तरी
भाजपकडून दाबोळीत माविन गुदिन्हो यांना तिकीट दिले जाईल. तसेच कुडतरी मतदारसंघात आर्थूर डिसिल्वा यांना तिकीट दिले
जाईल. भाजपकडे सध्या सहा ख्रिस्ती आमदार असून त्यांच्यासह आणखी दोन ख्रिस्ती उमेदवार
मिळून एकूण आठ ख्रिस्ती उमेदवार रिंगणात उतरविले जातील.
कुठ्ठाळीत मंत्री एलिना साल्ढाणा यांना दुसऱ्यांदा भाजप तिकीट देण्याची शक्यता आहे. ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारले, तर तिथे दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती उमेदवारालाच भाजपतर्फे उभे केले जाईल, अशी माहिती पक्ष
सूत्रांकडून मिळाली. (खास प्रतिनिधी)