नगरसेवक आमेठीच्या प्रचार दौर्यावर
By Admin | Updated: May 7, 2014 00:55 IST2014-05-06T19:02:34+5:302014-05-07T00:55:11+5:30
मुरगाव पालिका : अंदाजपत्रकावरील बैठक दुसर्यांदाही तहकूब

नगरसेवक आमेठीच्या प्रचार दौर्यावर
मुरगाव पालिका : अंदाजपत्रकावरील बैठक दुसर्यांदाही तहकूब
वास्को : अमेठीत प्रचारासाठी गेलेले वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्यासोबत मुरगावातील काही नगरसेवक गेल्याने मुरगाव पालिकेचे अंदाजपत्रक पुन्हा लटकले आहे. अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुसर्यांदा बोलाविण्यात आलेली मंडळाची बैठक पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. आता १२ मे रोजी होणार्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे़
गोवा नगरपालिका कायद्यानुसार प्रत्येक पालिकेने फे ब्रुवारी महिन्यात आपले वार्षिक अंदाजपत्रक सादर करावे, अशी तरतूद आहे; परंतु यंदा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अंदाजपत्रक मुदतीत सादर करणे शक्य झाले नाही़ १२ एप्रिल रोजी राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर गोवा निवडणूक आयुक्तांनी आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल केली़ त्यानुसार मुरगाव पालिका मंडळाने आपले अंदाजपत्रक सादर करण्यासाठी २६ एप्रिल रोजी प्रथम बैठक बोलाविली़ या बैठकीची सूचना एक-दोन दिवस अगोदर दिल्याने अंदाजपत्रकावर अभ्यास करण्यास वेळ मिळाला नसल्याच्या कारणावरून काही नगरसेवकांनी ही बैठक पुढे ढकलण्यास लावली. त्यानंतर ही बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती;परंतु काही नगरसेवक अमेठीत गेल्याने मंगळवारची बैठकही पुढे ढकलण्यात आली. या संदर्भातील सूचना सोमवारी देण्यात आली होती. आता १२ मे रोजी होणार्या बैठकीत अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे़ (प्रतिनिधी)